पुणे – कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना न्यायालयाच्या कामाची प्रत्यक्ष माहिती व्हावी. त्यांना अनुभवजन्य शिक्षण घेता यावे. त्यांना न्यायालयाचे कामकाज जवळून पाहता यावे, यासाठी टिळक महाराष्ट्र विद्यापीठ आणि जन अदालत या वकील संस्थेमध्ये सामंजस्य करार झाला आहे. आता जन आदालत ही संस्था टिळक लॉ कॉलेजमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना सहकार्य करणार आहे.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या पार्श्वभूमीवर या सामंजस्य कराराला विशेष महत्त्व आहे. या कराराच्या माध्यमातून विद्यार्थी वर्गाला अनुभवजन्य शिक्षण घेता येईल. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या माध्यमातून वारंवार कार्यशाळा, सेमिनारचे आयोजन केले जाते. तसेच, मूक कोर्ट व मोफत कायदेविषयक सल्ला केंद्र चालवले जाते. त्या उपक्रमामध्ये जन अदालतचे पदाधिकारी सहभागी होतील. जन अदालत ही संस्था अनेक वर्षांपासून वृध्द, महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे.
न्यायालयात नव्याने वकिली व्यवसाय सुरू करणाऱ्या ज्युनिअर वकिलांना प्रशिक्षण देण्यासाठी तसेच नव्याने होऊ घातलेल्या वकील, नोटरी, पब्लिक प्रोसीक्यूटर यांच्यासाठी सेमिनारच्या माध्यमातून प्रशिक्षण उपलब्ध करून देण्याचे काम मागील 18 वर्षांपासून करत आहे. विद्यार्थ्यांना पोलीस स्टेशन, गुन्हा दाखल करणे व तत्सम सामाजिक अनुभव घेता येतील, कोर्टात प्रत्यक्ष भेट देता येतील, केसेसबद्दलची माहिती मिळवता येणार आहे.
कायद्यासंदर्भातील विविधांगी विषयांमध्ये विद्यार्थ्यांना अनुभवसंपन्न करण्यासाठी दोन्ही संस्थामध्ये “समजुतीचा करारनामा” करण्यात आला. त्या वेळी टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलपती डॉ.दीपक टिळक, कुलगुरू डॉ.गीताली टिळक, जन अदालत संस्थेचे अध्यक्ष अॅड. सागर नेवसे, अॅड. राणी सोनावणे, टिळक विधी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.रोहिणी होनप, अॅड. अनिरुद्ध कुलकर्णी, डॉ.माणिक सोनावणे, प्रा.ऋचा शिंदे आदी उपस्थित होते.