शेवगाव – तालुक्यातील आखेगाव ग्रामपंचायतीने केलेल्या विविध विकासकामांमध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याने त्या अपहाराच्या कामाची चौकशी करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी गटविकास अधिकारी राजेश कदम यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. येत्या ७ दिवसांत याबाबत कारवाई झाली नाही तर सर्व गावकरी पंचायत समितीच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.
निवेदनावर रवींद्र ससाणे, घनश्याम पायघन, अरुण खर्चन, संजय पायघन, बाबासाहेब गोर्डे, भगवान कोल्हे, भानुदास नाचण, रामकिसन दातीर, लक्ष्मण गवळी यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांच्या सहया आहेत. या वेळी आखेगाव तितर्फा येथील रामकिसन दातीर यांना सरपंच अयोध्या शंकर काटे यांचे पती शंकर मनोहर काटे यांनी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये शिवीगाळ व धमकी दिली याची व्हिडीओ क्लिपदेखील चौकशीसाठी सादर करण्यात आली असून, ग्रामपंचायत हद्दीमधील बिहार पॅटर्नमध्ये रोजगार हमी योजनेमधील सरपंच यांच्या घरातील व्यक्तीची नावे टाकून काम न करता रोजगार हमीचे पैसे काढले,
सोमठाणे रोड दलित वस्तीसाठी क्रीडा विभाग (समाजकल्याण विभाग) यांच्याकडून काही व्यायाम साहित्य आले असता आणि ते दलितमध्ये बसवलेले असताना ते परस्पर सरपंच अयोध्या काटे आणि त्यांचे पती शंकर काटे यांनी खासगी शिक्षण संस्थाचालकांशी चिरीमिरी व आर्थिक व्यवहार करून आखेगाव येथील न्यू इंग्लिश स्कूल या ठिकाणी बसवण्यात आले आहे याची पाहणी करून कारवाई करण्यात यावी. १५व्या वित्त आयोगाचे काम दलित वस्तीमधील रस्ता काँक्रिटीकरण न करता परस्पर बिल काढले (गौतम ससाणे यांच्या घरापासून ते लेंडीनाला पर्यंत), चोपन वस्ती येथील सरकारी जागेत घरकुल आणि काही वस्तीपट येथे ३० ते ४० वर्षा पासून राहत असून,
त्यांना परस्पर सरपंचाच्या पतीने आणि सरपंचांनी शासकीय कोणतेही आदेश नसताना नोटीस काढून त्यांच्याकडून आर्थिक मागणी व शिवीगाळ करत त्यांना धमकावत आहेत, याची पूर्ण चौकशी करून योग्य ती कारवाई व्हावी, अशी विनंती निवेदनात करण्यात आली आहे. येत्या ७ दिवसांत याबाबत कारवाई झाली नाही तर सर्व गावकरी पंचायत समितीच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.