जामखेड – खा. सुजय विखेंच्या विरोधात आ. नीलेश लंके यांनी मोर्चेबांधणी करायला सुरुवात केली असून, गेल्या एक महिन्यात चार वेळेस आ. लंके यांचा विविध कार्यक्रमासाठी जामखेडचा दौरा झाला आहे. आ. लंके यांच्याकडून तालुक्यात साखरपेरणी केली जात असून, त्यातच एका कार्यक्रमादरम्यान आ. नीलेश लंके, आ. राम शिंदे व अजित पवार समर्थक व रत्नदीपचे अध्यक्ष डॉ. भास्करराव मोरे एकाच मंचावर येऊन राजकीय खलबते सुरू झाल्याची राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
नगर दक्षिण मतदारसंघ भाजपकडे दहा वर्षांपासून आहे. त्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसकडे हा मतदारसंघ होता. त्यामुळे भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशीच लढत मतदारसंघात अनेक टर्म दिसून आली आहे. सन २०१४मध्ये भाजपचे दिवंगत दिलीप गांधी, तर २०१९मध्ये सुजय विखे यांनी येथून विजय मिळवला. सन २०१९मध्ये खा. सुजय विखे यांनी दोन लाखांवर मताधिक्य घेत राष्ट्रवादीचे संग्राम जगताप यांना पराभूत केले. दरम्यान, या लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे आ. नीलेश लंके यांना उमेदवारीचे संकेत आहेत. त्यानुसार त्यांनी दोन वर्षांपासूनच तयारी सुरू केल्याचे दिसून येत आहे. जनमानसात आ. लंके यांना एक वेगळे स्थान आहे. ते राजकारणात प्रस्थापित असलेल्या विखे परिवाराला शह देऊ शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
आ. लंके यांनी जामखेड तालुक्याकडे विशेष लक्ष देण्यास सुरुवात केली असून, एका महिन्यात चार वेळेस विविध कार्यक्रमासाठी आ. लंके यांनी येऊन कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेतल्या आहेत, यावरूनच स्पष्टपणे आ. लंके तालुक्यात आगामी लोकसभेसाठी साखर पेरणी करत असल्याचे दिसत आहे. त्याचा प्रत्यय पंचायत समिती सदस्य डॉ. भगवान मुरूमकर यांच्या अभीष्टचिंतन कार्यक्रमातही दिसून आला. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून आ. राम शिंदे, आ. नीलेश लंके, सामाजिक कार्यकर्ते नीलेश गायवळ होते. या वेळी मंत्री अजित पवार यांचे खंदे समर्थक, तसेच विखे कुटुंबाशी सलोख्याचे संबंध असणारे रत्नदीप मेडिकलचे अध्यक्ष डॉ. भास्करराव मोरे यांनी हजेरी लावून आ. लंके यांच्यासह आ. राम शिंदे यांचे तोंडभरून कौतुक करून आश्चर्याचा धक्का दिला. त्या वेळी आगामी लोकसभेसाठी तालुक्यात आ. लंके, आ. शिंदे यांनी तगडे कार्यकर्त्यांची मोट बांधली असल्याचे दिसून आले.
त्याचबरोबर आ. राम शिंदे यांचाही विखे घराण्याशी राजकीय संघर्ष सुरू झाला असून, या आधी भाजपच्या राम शिंदे यांनीही आपल्याला पक्षाने आदेश दिल्यास लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरू, असे वक्तव्य केले होते. सध्या नगर जिल्ह्यातल्या भाजपमध्ये अंतर्गत मतभेद असल्याचं चित्र आहे. तसेच विधानसभेच्या निवडणुकीत विखे पाटलांमुळे आपला पराभव झाल्याचे मत आ. शिंदे यांचे आहे. त्यामुळे आ. शिंदे यांनीही विखेंवर वेगळ्या माध्यमातून दबाव टाकायला सुरुवात केल्याची चर्चा आहे.
आयात उमेदवार नको!
नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील नागरिकांनादेखील बाहेरच्या उमेदवारांऐवजी दक्षिणेकडील एखाद्या नेत्याने उमेदवारी करावी अशी अपेक्षा आहे. कारण दक्षिण नगर जिल्हा हा अवर्षणप्रवण जिल्हा म्हणून ओळखला जातो आणि उत्तरेकडून येणारे नेते हे दक्षिणेकडील दुष्काळी भागात लक्ष घालत नाहीत अशी चर्चा कायमच रंगलेली असते.
डॉ. भास्करराव मोरे यांची भूमिका गुलदस्त्यात!
रत्नदीपचे अध्यक्ष डॉ. भास्करराव मोरे जिल्ह्यात मंत्री अजित पवार यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जातात. त्याच बरोबर विखे घराण्याशी त्यांचे कौटुंबिक संबंध असताना एका कार्यक्रमात डॉ. मोरे यांनी आ. राम शिंदे यांचे तोंड भरून कौतुक केले, तसेच त्यांची भाजपच्या कार्यक्रमातील उपस्थिती आश्चर्याचा धक्का देणारी असल्यामुळे नागरिकांत संभ्रम निर्माण झाला आहे.