नगर – ऍड.धनंजय जाधव यांनी नेहमीच सकारात्मक दृष्टिकोनातून सामाजिक बांधिलकी जोपासत आपले कर्तव्य पार पाडले आहे. अनाम प्रेम संस्थेतील दिव्यांग विद्यार्थी आपले शिक्षण पूर्ण करण्यासाठी स्कूलमध्ये जाण्यासाठी धडपड करत असतात, ऍड.जाधव यांनी दिव्यांग व्यक्तींना मदतीचा हात देत मोफत साई द्वारका सेवा ट्रस्टच्या माध्यमातून स्कूल बस सेवा सुरू केली. स्कूल बसचा नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू केला असून तो कौतुकास्पद असल्याचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी म्हटले.
अनाम प्रेम संस्थेतील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ऍड. धनंजय जाधव यांच्या वतीने खा. डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते स्कूल बस सेवेचा प्रारंभ झाला. यावेळी अजित माने, अमित घाडगे, राहुल मुथा, पुरुषोत्तम सब्बन, अक्षय संभार आदींसह दिव्यांग विद्यार्थी उपस्थित होते. जाधव म्हणाले की, अनाम प्रेम संस्थेतील दिव्यांग विद्यार्थ्यांना स्कूल मध्ये जाताना विविध समस्यांना सामोरे जावे लागत होते.