पूर्व हवेलीत गुन्हेगारींमध्ये लक्षणीय वाढ
हनुमंत चिकणे
उरुळी कांचन – पुणे-सोलापूर लोहमार्गाचे विद्युतीकरण, पुणे-सोलापूर महामार्गाचे रुंदीकरण व दळणवळणाच्या वाढलेल्या सुविधांमुळे पूर्व हवेलीतील लोणी काळभोर, कुंजीरवाडी, उरुळी कांचनसह परिसरात आर्थिक उलाढालींचे प्रमाण वाढण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे या भागात परराज्यातून रोजीरोटीसाठी येणाऱ्यांच्या संख्येत देखील मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे फसवणूक, गुन्हेगारी अशा प्रकारांमध्येही मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे.
पूर्व हवेलीत हजारो भाडेकरू आहेत; मात्र हे सर्वजण अनोळखी आहेत. त्यामुळे घरमालकांना भाडेकरूंची 25 टक्केच माहिती असते व 75 टक्के काहीच माहिती नसते. लोणी काळभोर पोलिसांनी घरमालकांना आवाहन करूनही त्यांनी पोलिसांना ‘केराची टोपली’ दाखवली आहे. पोलिसांसाठी हे धोक्याचे असून, चोरी, खून, मारामाऱ्यांसह चोरीच्या घटनेतील अनेक संशयित आरोपी हे भाड्याने राहत असल्याचे काही तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळेच सामान्यांच्या सुरक्षिततेसाठी घरमालकांनी भाडेकरूंची नोंद पोलीस स्टेशनला करण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले होते.
लोणी काळभोर व उरुळी कांचन परिसरात मोठ्या प्रमाणावर मोठ्या कंपन्या, नर्सरी व्यवसाय, छोटे-मोठे उद्योगधंदे, शौक्षणिक संस्था असल्याने या परिसरात मोठ्या प्रमाणात घरे भाड्याने दिली जातात. औद्योगिक वसाहतीत काम करणारे कामगार तसेच मजूर व लहान लहान व्यवसाय करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्याबरोबर या परिसरात गुन्हेगारी प्रवृत्तीची लोकही राहतात. ते दिवसभर फिरून पाहाणी करतात.
रात्री दुचाकी चोरणे, घरफोडी, मोबाईल चोरीचे प्रकार करतात. त्यानंतर ते त्यांच्या राज्यात निघून जातात.कोरेगाव मूळ ग्रामपंचायत हद्दीत अंमली पदार्थ विरोधी पथकाने कोरेगाव मूळ (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील प्रयागधाम ट्रस्ट हॉस्पिटलच्या शेजारी असलेल्या बस स्टॉपवरून एकाला ताब्यात घेतले होते. यावेळी त्याच्याकडून तब्बल 36 लाख रुपये किंमतीचे मेफेड्रॉन ड्रग्स पोलिसांनी जप्त केले होते.
उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीत मागील आठ महिन्यांपूर्वी 500 रुपयांच्या बनावट नोटा छापणाऱ्या एका आरोपीला सोलापूर स्थानिक गुन्हे (ग्रामीण) अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी उरुळी कांचन येथून ताब्यात घेतले होते. त्याने भाड्याने खोली घेतली होती. याच खोलीत जवळपास 6 लाखांच्या बनावट नोटा छापल्या होत्या. त्या नोटा बाजारात वितरीत करण्याच्या अगोदरच पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या.
या गावांमध्ये आहेत भाडेकरू
* लोणी काळभोर, कदमवाकवस्ती, उरुळी कांचन, सोरतापवाडी परिसरात सर्वाधिक संख्या
* नर्सरी व्यवसाय असलेल्या ठिकाणी मोठे वास्तव्य
* जुना व नवीन उजवा मुळा मुठा कालव्याच्या बाजूला अनेकांचे वास्तव्य
* लोणी काळभोर, कदमवाकवस्ती, उरुळी कांचन येथे शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक
काय घ्यावी खबरदारी?
* ओळखीशिवाय खोल्या भाड्याने देऊ नये
* भाड्याने खोल्या दिल्यानंतर संबंधितांची माहिती ठेवण्याची सक्ती करावी
* भाडेकरूची माहिती न ठेवणाऱ्या घरमालकांवर पोलिस कारवाई गरजेची
* भाडेकरू परप्रांतीय असल्यास त्याच्या आधारकार्ड व त्याची कागदपत्रे यांची पूर्तता करावी.