नगर – राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाकडून अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघासाठी रोहित पवार व माझे नाव उमेदवारीसाठी सुचवले गेले असले तरी राहुरी विधानसभा लढण्याची माझी वैयक्तिक इच्छा आहे. मंत्रीपदी काम केल्याचा अनुभव असल्याने अधिक विकासात्मक काम त्यामुळे राहुरी मतदार संघात करता येईल, त्यामुळे मी विधानसभेसाठी इच्छुक आहे, अशी भूमिका आमदार प्राजक्त तनपुरे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत जाहीर केली. मात्र, पक्ष संघटनेचे जे मत व आदेश असेल त्याचा आदर राहणार आहे, असेही त्यांनी आवर्जून सांगितले.
ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचा मुंबईत आढावा घेतला. त्यावेळी झालेल्या चर्चेची माहिती तनपुरे यांनी माध्यमांना दिली. पारनेरचे आमदार निलेश लंके यांचे नाव सुचवले गेले, परंतु त्यांच्यासह अनेक आजी-माजी आमदारांची अडचण झाली आहे. एकीकडे सत्तेसमवेत राहायचे की शरद पवारांच्या विचारांसमवेत राहायचे, असा संभ्रम त्यांच्यात आहे. त्यामुळे अशा सर्वांना दसऱ्यापर्यंत मुदत देऊन तोपर्यंत त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करण्याचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले आहे, असेही तनपुरे म्हणाले.
मागच्या 2019 च्या विधानसभा निवडणुकीत दक्षिणेत पक्षाचे चार आमदार होते, आता दोन जण अजितदादा गटाबरोबर आहेत तर भाजपचे दोन जण विरोधात आहेत, परंतु शरद पवार यांच्याविषयी सहानुभूती व त्यांना मानणारा मोठा वर्ग यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीसह विधानसभा निवडणुकीतही पक्षाला चांगले यश मिळेल,असा दावा करून तनपुरे म्हणाले, नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ कोणत्याही मित्र पक्षाला सोडला जाणार नाही. राष्ट्रवादीकडे सक्षम उमेदवार लोकसभेसह प्रत्येक विधानसभा मतदारसंघात आहेत,असा दावाही त्यांनी केला.
खासदारांचे शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष
विद्यमान खासदारांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर संसदेत आवाज उठवल्याचे कधी पाहिले नाही. कांदा निर्यात शुल्क असेल व शेतमालाचे पडलेले भाव असतील त्यावर ते कधीही बोलले नाही यातून भाजपची शेतकरी विरोधी भूमिका स्पष्ट होते. याशिवाय दक्षिणेतील राष्ट्रीय महामार्गांची दुरावस्था झाली आहे,मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेत अधिकारी पैसे खात आहेत. सत्ताधारी फोडाफोडीत मग्न आहेत, अशी टीकाही तनपुरे यांनी केली.