पिंपरी – पावसाळा संपला असून शहरातील प्रस्तावित रस्त्यांच्या कामाला गती द्यावी. डिसेंबरअखेरपर्यंत रस्त्यांची कामे पूर्ण करावीत. देहूरोड-कात्रज बाह्यवळण महामार्गावरील सेवा रस्त्यासाठीच्या संपूर्ण जागेचे भूसंपादन करावे. गृहनिर्माण सोसायटी धारकांना सर्व सोयी-सुविधा द्याव्यात. पीएमआरडीए हद्दीतील गृहनिर्माण सोसायट्यांमधील सांडपाणी थेट नदीत सोडण्यात येत असून या सोसायट्यांवर कारवाई करण्याचे निर्देश शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी दिले.
शहरातील रस्ते, गृहनिर्माण सोसायट्यांचे प्रश्न, पायाभूत सुविधांबाबत खासदार बारणे यांनी महापालिका, पीएमआरडीए, एमएसआरडीसी, एनएचआयच्या अधिका-यांसोबत बैठक घेतली. पायाभूत सुविधा, पाणी, ड्रेनेज, पवना नदी प्रदूषण, वाहतूक व्यवस्थेबाबत सविस्तर चर्चा झाली. महापालिका आयुक्त शेखर सिंह, पीएमआरडीएचे आयुक्त राहुल महिवाल, पालिकेचे अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे, शहर अभियंता मकरंद निकम,एमएसआरडीसी, एनएचआयचे अधिकारी उपस्थित होते.
खासदार बारणे म्हणाले, प्रस्तावित रस्त्यांच्या कामाला सुरुवात करावी. पुनावळे, वाकड, ताथवडेतील डीपी रस्ते, मामुर्डी, किवळे, विकासनगर, रावेतमधील रस्ते, फुटपाथ विकसित करण्याच्या कामाला गती द्यावी. पवनानदीवर मामुर्डी ते सांगवडे दरम्यान हिंजवडीला जाण्यासाठी पूल बांधण्याचे काम हाती घ्यावे. रस्त्यांची कामे डिसेंबअखेरपर्यंत पूर्ण करावीत. कामाचा दर्जा राखावा. निगडी पर्यंत मेट्रोला मान्यता मिळाली आहे. लवकरच त्याच्या कामाला सुरुवात होईल. त्यासाठीची आवश्यक असलेली लाइट पोल, विद्युत तारा शिफ्टींगची प्रस्तावित कामे हाती घ्यावीत.