पुणे – पुणे रेल्वे स्थानकावर चार लिफ्ट आणि रॅम्प उभारण्याच्या कामाला मध्य रेल्वे बोर्डाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे प्रवाशांची फ्लॅटफॉर्मवरून पादचारी पुलावर जाताना आणि खाली उतरताना होणारी दमछाक कमी होणार आहे. त्यासाठी दहा कोटीचा निधीही मंजूर करण्यात आला असून लवकरच प्रवाशांसाठी ही सेवा सुरू होईल.
मध्य रेल्वे विभागातील मुंबई, नागपूर, भुसावळ पाठोपाठ पुणे रेल्वे स्थानक सर्वात मोठे स्थानक आहे. येथून दररोज 230 पेक्षा अधिक रेल्वे गाड्या धावतात तर जवळपास दीड लाख प्रवासी असतात. त्यामुळे या स्थानकांवर प्रवाशांची 24 तास गर्दी असते. स्थानकावर सहा फ्लॅटफॉर्म आहेत. पहिल्या प्लॅटफॉर्मवरून 2 ते 6 प्लॅटफॉर्मवर जायचे म्हटल्यावर एक्सिलेटर किंवा जिन्याने बॅगा घेऊन पादचारी पुलावर जायचे. तेथून चालत पुन्हा इच्छित प्लॅटफॉर्मवर उतरण्यासाठी जिन्याने जावे लागते. त्यात एक्सिलेटर बंद पडल्यावर प्रवाशांची अनेक दिवस मोठी दमछाक होत आहे.
एवढ्या मोठ्या रेल्वे स्थानकावर लिफ्टची सुविधा असावी, अशी मागणी प्रवाशांसह रेल्वे समितीच्या सदस्यांनीही बैठकीत केली होती. त्याबाबत पुणे रेल्वे विभागाकडून सर्व्हेक्षण करून लिफ्ट आणि रॅम्प उभारण्याबाबत प्रस्ताव पाठविला होता. त्यात बोर्डाने सुचविलेल्या त्रुटीमध्ये बदल करून पुन्हा प्रस्ताव पाठविण्यात आला. आता, या प्रस्तावाला नुकतीच मध्य रेल्वे विभागाकडून मंजुरी देत या कामावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
लिफ्ट आणि रॅम्प चार ठिकाणी…
पुणे रेल्वे स्थानकावर चार ठिकाणी लिफ्ट बसविण्यात येणार आहे. त्याच्याच बाजूला रॅम्पही तयार करण्यात येणार आहे. यासाठी दहा कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. प्लॅटफॉर्म क्र. 6 येथे पुरेशी जागा उपलब्ध नाही. लिफ्ट आल्यावर प्रवाशांना चालण्यासाठी अडचणी येऊ शकतील, त्यामुळे याठिकाणी लिफ्ट नाही. मात्र, या चार लिफ्ट आणि रॅम्पमुळे प्रवाशांना दिलासा मिळणार असून त्यांची होणारी दमछाक कमी होईल.
मध्य रेल्वे बोर्डाकडून नुकतीच चार लिफ्ट आणि रॅम्पसाठी मंजुरी दिली आहे. आता या कामासाठी निविदा प्रक्रिया राबवून प्रत्यक्ष कामाला सुरवात होईल. या लिफ्टमुळे प्रवाशांना आणखी चांगली सेवा देणे शक्य झाले आहे.
– डॉ. रामदास भिसे, जनसंपर्क अधिकारी, पुणे रेल्वे विभाग