पाथर्डी – पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी आलेल्या सोमठाणे नलावडे येथील उपसरपंचाला गावातील अवैध दारू विक्रेत्यांनी पोलीस ठाण्याच्या आवारात मारहाण केल्याची घटना पाथर्डी येथे घडली. याबाबत पोलिसांनी दोन्ही गटाच्या सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
सोमठाणे नलवडे येथे ग्रामसभेत दारूबंदीचा ठराव करण्यात आला. या कारणावरून उपसरपंच आकाश दौंडे यांचा योगेश दौंडे याच्य़ांशी वाद झाला. त्यानंतर आकाश दौंडे पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आले. त्यानंतर पोलीस ठाण्याच्या आवारात दोन गटांत हाणामारी झाली. पोलिसांनी सार्वजनिक ठिकाणी मारामारी केल्याप्रकरणी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दौंडे यांच्या दोन गटांत झालेल्या हाणामारीत पोलीस उपनिरीक्षक सचिन लिमकर व सहकाऱ्यांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला आहे.
सोमठाणे नलवडे येथे ग्रामसभेने दारुबंदीचा ठराव घेतलेला आहे. आकाश दौंडे यांनी योगेस दौंडे याला दारू विकू नको, असे सांगितले. त्याचा राग येउन योगेश दौंडे याने आकाश दौंडे याला मारहाण केली. आकाश दौंडे यांनी योगेश दौंडे विरुद्ध पोलिसात अदखलपात्र गुन्हा दाखल केला. दौंडे हे सहकाऱ्यांसह पोलीस ठाण्यातून बाहेर जाताना योगेश दौंडे, सचिन दौंडे, संतोष दौंडे, मनोज तुपविहरे समोरून आले. यावेळी दोन्ही गटांत हाणामारी सुरू झाली. आवाज येताच सहाय्यक पोलीस निरीक्षक राजगुरु, उपनिरीक्षक सचिन लिमकर, कृष्णा बडे, अनिल बडे, सचिन नवगिरे, भगवान सानप, बडे, वारे आदि सर्वजण धावले. पोलीस नाईक दत्तात्रय बडधे यांच्या फिर्यादीवरुन दोन्ही गटातील योगेश दौंडे,
सचिन दौंडे, संतोष दौंडे, मनोज तुपविहरे व आकाश दौंडे आणि दोन अनोळखी अशा सात जणांविरु्दध सार्वजनिक ठिकाणी हाणामारी केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी या प्रकरणी पाच जणांना ताब्यात घेतले होते.