मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याचा मुहूर्त ठरला

7 मार्च रोजी करणार अयोध्या दौरा

मुंबई : अयोध्येतील रामजन्मभूमीचा वाद मिटल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अयोध्या दौरा करणार असे शिवसेनेकडून सांगण्यात आले होते. त्यांच्या याच दौऱ्याचा मुहूर्त आता ठरला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे येत्या 7 मार्च रोजी अयोध्येत जाणार असल्याची माहिती, शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी दिली. राज्य सरकारचे 100 दिवस पूर्ण झाल्यानंतर अयोध्येत जातील, असे यापूर्वी सांगण्यात आले होते. परंतु आता ते 7 मार्च रोजी अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. तसेच त्यांचा संपूर्ण कार्यक्रम ठरला आहे, असे राऊत म्हणाले.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे अयोध्येला जाणार याबाबत घोषणा झाली होती. सरकारला 100 दिवस झाल्यानंतर ते जातील असे सेनेकडून म्हटले होते. परंतु आता 7 मार्चला ते अयोध्येला जातील. या ठिकाणी ते राम लल्लाचे दर्शन घेतील. तसेच शरयू तीरावर आरतीही करतील, अशी माहिती राऊत यांनी दिली. यावेळी हजारो शिवसैनिकही अयोध्येत जातील, असेही त्यांनी नमूद केले. हा आमचा श्रद्धेचा विषय आहे. त्याचे कोणीही राजकारण करू नये. राजकीय दृष्टीने याकडे पाहू नये, असेही त्यांनी स्पष्ट केले.

कॉंग्रेसच्या हंगमी अध्यक्षा सोनिया गांधी, कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही राममंदिराच्या निकालाचे स्वागत केले होते. त्या ठिकाणी राममंदिर उभारले जावे, अशी त्यांचीही धारणा होती, असे माझ्या वाचनात आणि ऐकीवात आले होते. त्यामुळे सल्ले देणाऱ्यांनी आधी माहिती घ्यावी आणि नंतर बोलावे, असे ते एका विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले. यापूर्वी त्यांनी 24 नोव्हेंबर 2018 रोजी आपल्या पत्नी रश्‍मी ठाकरे आणि सुपुत्र आदित्य ठाकरे यांच्यासोबत अयोध्या दौरा केला होता. त्यानंतर 24 नोव्हेंबर 2019 रोजी होणारा त्यांचा प्रस्तावित दौरा रद्द करण्यात आला होता. सुरक्षेच्या कारणास्तव हा दौरा रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात आले होते.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here