मार्केटयार्डात आवक : तयार पाकिटांना मोठी मागणी
पुणे – थंडीत हुरड्याची चाहुल लागते. यासाठी खास कृषिपर्यटनही केले जाते. नोकरी तसेच व्यवसायामुळे अनेकांना खास शेतात जाऊन हुरडा पार्टी करण्यासाठी वेळ मिळत नाही. शहरी भागातील ग्राहकांसाठी खास हुरड्याची तयार पाकिटे बाजारात दाखल झाली असून मार्केटयार्डातील बाजार आवारात हुरड्याची आवक वाढली आहे.
श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्डात नगर आणि सोलापूर जिल्ह्यांतून दररोज 20 ते 40 किलो हुरडा विक्रीसाठी पाठविला जात आहे. तो प्लॅस्टिक पिशवीत पाठवला जात असून घाऊक बाजारात एक किलो हुरड्याची विक्री 120 ते 150 रुपये या भावाने विक्री केली जात आहे.
किरकोळ बाजारात हुरड्याच्या एक किलो पाकिटाची विक्री 200 ते 250 रुपये दराने केली जात आहे. सोलापूर जिल्ह्यातील बाळासाहेब पवार यांनी मार्केटयार्डातील आडते गणेश घुले यांच्या गाळ्यावर हुरडा विक्रीसाठी पाठविला आहे. थंडीत हुरडा चार ते पाच दिवस टिकतो तसेच चवीतही काही बदल होत नाही, अशी माहिती मार्केटयार्डातील व्यापारी पांडुरंग सुपेकर यांनी दिली.