पुणे शहरातील हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी संस्थेशी करार

पुणे – शहरातील हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी आणि क्‍लायमेट रेझिलियन्ससाठी “नॅचरल रिसोर्स डिफेन्स काऊन्सिल (एनआरडीसी) आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ (गांधीनगर) या संस्थेसोबत करार करण्यात आला. या दोन्ही संस्था आणि पाषाण येथील “आयआयटीएम’ संस्था आणि महापालिका यांच्या सहभागातून “सफर’ या उपक्रमांतर्गत शहरातील वेगवेगळ्या ठिकाणातील हवा प्रदूषणाच्या प्रमुख घटकांचे प्रमाण मोजण्याची चाचणी यंत्रे बसवली आहेत. महापौर मुक्‍ता टिळक यांच्या उपस्थितीत मंगळवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी स्थायी समिती अध्यक्ष सुनील कांबळे, आयुक्‍त सौरभ राव, अधिकारी मंगेश दिघे, आयआयपीएच संस्थेचे दिलीप मावळणकर, एनआरडीसीचे पोलाश मुखर्जी आदी उपस्थित होते.

या करारांतर्गत शहराच्या हवेची गुणवत्ता आणि हवा प्रदूषणाशी निगडीत आजारांची माहिती आणि आरोग्यावर होणारे परिणाम या संबंधी काम करण्यासाठी हेल्थ रिस्क कम्युनिकेशन प्लॅन तयार करण्यात येणार आहे. या प्लॅनमध्ये हवेच्या गुणवत्तेसाठी अलर्ट सिस्टीम, हवा प्रदूषणाशी विविध विभागांमध्ये सुसूत्रता, जनजागृती उपक्रम हाती घेण्यात येणार आहे. हवा प्रदूषणाशी संबंधी स्वास्थ्याच्या दृष्टीने नागरिकांनी घ्यायची काळजी आणि हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी नियोजन करण्यात येणार आहे.

शहरासाठी “कूल रुफ्स’ ही संकल्पना मांडण्यात येणार आहे. यामध्ये इमारतीच्या आतील तापमान कमी होण्यासाठी उपाययोजनांवर भर देण्यात येणार आहे. यामुळे इमारतींमधील उर्जेची बचत होणार आहे. अशा रुफ्समुळे ऊर्जा बचत तर होतेच परंतु इमारतींमध्ये नैसर्गिक पद्धतीने थंडावा दीर्घकाळ टिकण्यासाठी देखील मदत होते, असा दावाही त्यांनी केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.