पुणे – मुंबई प्रवासाची वाट बिकट !

लोणावळ्यातील एसटी स्थानकावर बस नसल्याने प्रवाशांची गैरसोय 
लोणावळा –
लोणावळा-खंडाळा परिसरात कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग आणि रेल्वे लाइनवर दरड कोसळली. त्यामुळे प्रवाशांनी राज्य मार्ग परिवहन (एस.टी.) महामंडळाच्या “वाट’ धरली खरी पण हा रस्ताही बिकट आहे. रेल्वे प्रवासावर दरडींमुळे “पाणी’ पडल्यामुळे प्रवासी एसटीचा मार्ग धरत असले तरी लोणावळा स्थानकात बस नसल्यामुळे प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.

मागील काही दिवसांपासून लोणावळा परिसरात मुसळधार पाऊस पडत आहे. मध्य रेल्वेची पुणे-मुंबई रेल्वे सेवा कोलमडून पडल्याने पुणे-मुंबई प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत. लोणावळा रेल्वे स्थानकावर गाड्या रद्दची घोषणा झाली की प्रवासी पर्यायी मार्ग म्हणून लोणावळा एसटी बस स्थानकाकडे धाव घेतात. आणि तेथे गेल्यावर मात्र स्थानकात बस नसल्याचे निदर्शनास आल्यावर हवालदिल होतात, हे आता रोजचे चित्र झाले आहे. यामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

लोणावळा शहरात राष्ट्रीय महामार्गालगतच्या गवळीवाडा या ठिकाणी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे प्रशस्त बस स्थानक आहे. मात्र खासगीकरणाच्या नावाखाली शहराच्या बाहेरील वलवण गावात दोन खासगी हॉटेलांना बसचे थांबे दिल्याने अधिकृत बस थांबा ओस पडला आहे. सर्व बस चालक या अधिकृत थांब्यावर आपली बस न आणता, शहराबाहेरील त्या खासगी थांब्यावर आपल्या बस थांबण्यासाठी घेऊन जातात. याचा फटका लोणावळा शहरात येणारे प्रवासी व शहरातून परगावी जाणारे प्रवासी यांना बसत आहे.

शहरांतून या खासगी बस स्थानकापर्यंत पोचण्यासाठी प्रवाशांना रिक्षासाठी खूप पैसे मोजावे लागतात. जेवढे पैसे लोणावळा-मुंबई या प्रवासासाठी लागतात तेवढे पैसे लोणावळा ते “या’ खासगी बस स्थानकांमध्ये असलेल्या दोन ते तीन किलोमीटर अंतरासाठी मोजावे लागतात. सोबतच या खासगी बसस्थानक कम हॉटेलमध्ये खाण्यापिण्याच्या वस्तुंसाठी देखील अधिक किंमत मोजावी लागते, अशी तक्रार प्रवासी वारंवार करीत आहेत.

शहराबाहेरील थांबे बंद करत पुन्हा बस महामंडळाच्या या अधिकृत थांब्यावर थांबविण्याची मागणी लोणावळेकर नागरिक करीत आहेत. मात्र एस.टी. महामंडळाकडून वारंवार या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याने लोणावळा शहरात येणाऱ्या हजारो प्रवाशांसोबतच स्थानिकांना देखील याचा मनस्ताप सहन करावा लागत आहे. या गोष्टीचा गैरफायदा मात्र खासगी प्रवासी वाहतुकदारांनी घेतला आहे. हे वाहतूकदार आपली वाहने महामंडळाच्या बस स्थानकातच उभी करून गैरफायदा घेत आहेत; पण सोबत प्रवासाकरिता अव्वाच्या सव्वा भाडी घेत प्रवाशांची लूट करीत आहेत.

दरडी पडण्याच्या घटनांमुळे पावसाळा सुरू झाल्यापासून वारंवार रेल्वे सेवा विस्कळीत होत आहे. यामुळे पर्यायी प्रवासी मार्ग म्हणून प्रवासी एसटी बसचा पर्याय निवडतात. मात्र बस स्थानकात बसच येत नसल्याने प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. स्थानिक प्रशासनाने यावर तोडगा काढत शहराबाहेरील बस थांबे बंद करुन पुन्हा एसटी बस अधिकृत थांब्यावर थांबविण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)