सासवड – कोडीत बुद्रुक आणि कोडीत खुर्द (ता. पुरंदर) येथील अवैध दारूधंदे कायमस्वरूपी बंद करण्यात यावेत, या मागणीसाठी दोन्ही ग्रामपंचायतींच्या आणि ग्रामस्थांच्या वतीने ग्रामदैवत भैरवनाथ मंदिरासमोर सोमवारी (दि. 22) ऑगस्ट रोजी जाहीर लाक्षणिक उपोषण आंदोलन सुरू केले होते.
यापूर्वी दोन्ही ग्रामपंचायतींच्या वतीने आणि ग्रामस्थांच्या वतीने अनेक वेळा लेखी निवेदन देऊन, समुहाने मोर्चाचे आयोजन करूनही कोडीत येथील अवैध दारूधंदे कायमस्वरूपी बंद करण्यासाठी पोलीस प्रशासनाने निर्णय घेऊन कारवाई केली नाही. कोडीत गावात 30 वर्षांपेक्षा जास्त काळ खुलेआम बेकायदेशीर दारूधंदे सुरू आहेत; परंतु एकाही दारूधंदेवाल्यावर तडीपारीची किंवा त्याहीपेक्षा गंभीर स्वरूपाची कारवाई करण्यात आली नाही, त्यामुळे ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली आणि जोपर्यंत गावातील दारूधंदे कायमस्वरूपी बंद करण्यात येत नाहीत, तोपर्यंत ग्रामस्थांच्या वतीने तालुका जिल्हा आणि वरीष्ठ अधिकारी यांच्या कार्यालयासमोर आंदोलने केली जातील असा इशारा देण्यात आला.
आंदोलनांचे आयोजन कोडीत बुद्रुक आणि खुर्द ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले होते. या आंदोलनास दोन्ही गावचे आजी-माजी सरपंच, उपसरपंच आजी-माजी ग्रामपंचायत सदस्य, देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त, सोसायटीचे संचालक, व शेकडोच्या संख्येने महिला उपस्थित होते. यावेळी सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आण्णासाहेब घोलप यांनी आंदोलकर्त्यांशी चर्चा करून कोडीत येथील सर्व अवैध दारूधंदे कायमस्वरूपी बंद करण्यात येतील आणि दारूधंदे करणाऱ्यांवर तडीपारीची किंवा त्याहीपेक्षा गंभीर स्वरूपाची कारवाई करण्यात येईल असे लेखी आश्वासन दिली. याबरोबरच काही व्यक्तींवर केलेल्या कार्यवाहीची माहिती दिली.
यावेळी पोलीस निरीक्षक विनोद महांगडे, कर्मचारी, कोडीत बुद्रुकचे पोलीस पाटील गणेश बडधे, कोडीत खुर्दचे पोलीस पाटील उमेश तळेकर यांसह ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी कोडीत बुद्रुकच्या सरपंच रंजना खुटवड आणि खुर्दचे सरपंच प्रसाद खैरे यांनी गावातील दारूधंदे कायमस्वरूपी बंद न केल्यास उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा लेखी पत्राने इशारा दिला.