इंदोरी – फिरंगाई डोंगरावर फिरायला गेलेला तरूण घसरून पडल्याने गंभीर जखमी झाला. वन्यजीव रक्षक मावळ संस्था व ग्रामस्थ यांच्या मदतीने त्याला सुरक्षितपणे बाहेर काढत, त्याच्यावर प्राथमिक उपचार केले. त्यानंतर पुढील उपचाराकरिता पवना रूग्णालयातदाखल करण्यात आले आहे. युदाजित चक्रबोरती (वय 19) असे या जखमी तरूणाचे नाव असून, तो मूळचा कोलकाता येथील रहिवासी असून तो मावळमधील इंदोरी येथील तोलानीचा विद्यार्थी आहे.
वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे संस्थापक निलेश गराडे यांना रविवारी (दि.21) सायंकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास फिरंगाई डोंगरावर ट्रेकिंगसाठी गेलेला ग्रुपमधील एक तरुण पाय घसरून पडून गंभीर जखमी झाल्याची माहिती समजली. क्षणाचाही विलंब न लावता वन्यजीव रक्षक मावळ आपत्ती व्यवस्थापन रेस्क्यू टीमचे अध्यक्ष गणेश निसाळ, गणेश ढोरे, भास्कर माळी, सत्यम सावंत, अविनाश कारले, रौनक खरे, विक्रांत अग्रवाल व इतर सदस्य वनरक्षक घटनास्थळी पोहोचले. मंगल ढोरे व ग्रामस्थ हे सर्व घटनास्थळी आपले साहित्य घेऊन रवाना झाले.
घटनास्थळी पोहोचल्यानंतर जखमी तरूणाची पाहणी केली. तो पाय घसरून कातळ खडकावर पडून घसरत गेल्याने त्याच्या हातांवर व डोक्यावर जखमा झाल्या होत्या.त्याच्या हाताची नखे कापली गेल्याने रक्तस्त्राव सुरू होता. घटनेचे गांभीर्य ओळखून तत्काळ त्यास प्रथम उपचार करुन स्ट्रेचरवरून तीन तासाच्या अथक परिश्रमानंतर पायथ्याला आणले.
पाऊस आणि काळोख असल्याने त्याला खाली आणताना अडचणी येत होत्या.या तरूणाच्या डोक्याला तसेच दोन्ही हातांना गंभीर इजा झाल्याने रक्तस्त्राव झाला होता. अशा परिस्थितीमध्ये लवकरात लवकर त्याला हॉस्पिटलमध्ये पोहोचवण्याचे आव्हान टीम समोर होते. या सर्व परिस्थितीवर मात करत रेस्क्यू टीमच्या सदस्यांनी त्याला डोंगराच्या पायथ्याला व पायथ्या पासुन रोडपर्यंतचा प्रवास चिखल, चढउतार करत गवतातून, मार्ग काढत ऍम्बुलन्सपर्यंत पोहोचले आणि तात्काळ सोमाटणे फाट्याजवळील रुग्णालयात सुरू आहेत.