-ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पेनीचे पंचांशी गैरवर्तन
-बडोदा संघाचा कर्णधार कृणाल पंड्याकडून हुडाला धमकी
सिडनी – भारत व ऑस्ट्रेलिया कसोटीत घडलेला वर्णद्वेषी टीकेचा प्रसंग असो किंवा यजमान संघाचा कर्णधार टीम पेनीने पंचांना केलेली शिवीगाळ असो रविवारचा दिवस क्रिकेटसाठी काळिमा फासणारा ठरला. त्यात भर म्हणजे भारतात सय्यद मुश्ताक अली टी-20 स्पर्धेसाठी सराव करत असताना बडोदा संघाचा कर्णधार कृणाल पंड्याने आपलाच सहकारी खेळाडू दीपक हुडा याला धमकी दिल्याने क्रिकेट क्षेत्रासाठी हा दिवस ब्लॅक संडेच ठरला.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्याचा चौथा दिवस चांगलाच वादग्रस्त ठरला. शनिवारी मैदानातील काही प्रेक्षकांनी जसप्रीत बुमराह व महंमद सिराज यांना उद्देशून वर्णद्वेषी टीका केली होती. तशीच घटना रविवारी देखील घडली. मैदानावर घडलेल्या या प्रकाराबाबत भारतीय संघाने पंचांकडे तक्रार केली. त्यानंतरदेखील चौथ्या दिवशी सिडनीच्या मैदानातील काही चाहत्यांनी त्याच प्रकाराची पुनरावृत्ती केल्याने खेळ थांबवण्याची नामुष्की आली.
ऑस्ट्रेलिया मंडळाकडून दिलगिरी
घडलेल्या प्रकारानंतर ऑस्ट्रेलिया क्रिकेट मंडळाने भारतीय संघाची लेखी माफी मागितली. ज्यांनी गैरवर्तनन केले अशा प्रेक्षकांची गय केली जाणार नसून, त्यांना यापुढे मैदानात प्रवेशही दिला जाणार नाही, असेही सांगण्यात आले.
सिराज क्षेत्ररक्षण करत असताना काही प्रेक्षक त्याला उद्देशून शेरेबाजी करत होते. त्यांच्याकडून सातत्याने हा प्रकार घडल्यानंतर मात्र, त्याने ही बाब कर्णधार अजिंक्य रहाणेला सांगितली. त्यानंतर रहाणेने पंचांशी याबाबत चर्चा केली. जोवर ही परिस्थिती सुधारत नाही तसेच वर्णद्वेषी टीका करत असलेल्या प्रेक्षकांना मैदानाच्या बाहेर काढण्यात येत नाही तोपर्यंत खेळ सुरू होऊ नये, असे रहाणेने सांगितले व त्यानुसार एका स्टॅण्डमधील काही प्रेक्षकांना पोलिसांच्या मदतीने मैदानाबाहेर काढले गेले व त्यानंतरच खेळ सुरू झाला.
टीम पेनीचे पंचांशी गैरवर्तन
पहिल्या डावात भारताच्या चेतेश्वर पुजाराला नाबाद ठरवले गेल्याने ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेनी याचा तोल ढळला व त्याने भर मैदानातच पंचांशी गैरवर्तन केले. त्याने हा निर्णय न पटल्याने थेट पंचांनाच जाब विचारला व त्यांना उद्देशून अपशब्दही वापरले. या घटनेची माहिती दोन दिवसांनंतर ऑस्ट्रेलिया क्रिकेट मंडळाकडून माध्यमांना समजली.
पंचांनी याबाबत सामनाधिकारी डेव्हिड बून यांच्याकडे तक्रार केली असून आता पेनीवर काय कारवाई होणार ते लवकरच स्पष्ट केले जाणार आहे. नाथन लियॉन गोलंदाजी करत असताना पुजाराच्या पॅडला लागून चेंडू उडाला आणि तो झेल घेण्यात आला. पुजाराला पंचांनी नाबाद ठरवल्यानंतर लगेचच ऑस्ट्रेलियन कर्णधार टीम पेन याने डीआरएस घेतला. तोच चेंडू बॅटच्या आतल्या बाजूला लागल्याने ऑफ साईडच्या कॅमेरात काहीही स्पष्ट होऊ शकले नाही.
तसेच लेग साईडच्या कॅमेरामधून सिली पॉईंटच्या क्षेत्ररक्षकामुळेही काही उलगडा झाला नाही. त्यात स्निको मीटरचीही मदत घेऊन पाहण्यात आली. तसेच हॉटस्पॉटमध्येही पुजाराच्या बॅटवर चेंडू लागल्याचे दिसले नाही. त्यामुळे पुजाराला नाबाद ठरवण्यात आले. या निर्णयावर पेनी चिडला व त्याने पंचांशी वाद घातला व त्यांना उद्देशून अपशब्दही वापरले.
कृणाल पंड्याने दिली कारकिर्द संपवण्याची धमकी
भारतात देशांतर्गत क्रिकेटचा मोसम रविवारपासून सुरु झाला व पहिल्याच दिवशी त्याला बट्टा लागला. सय्यद मुश्ताक अली टी-20 क्रिकेट स्पर्धेच्या तयारीसाठी बडोद्याचा संघ सराव करत होता. त्यादरम्यान कर्णधार कृणाल पंड्या व दीपक हुडा यांच्यात शाब्दीक चकमक उडाली. त्यावेळी पंड्या याने हुडाला त्याची कारकिर्द संपवण्याची धमकीही दिली. याबाबत हुडाने बीसीसीआयला पत्र पाढवले असून या प्रकारामुळे आपण या स्पर्धेत खेळणार नसल्याचे सांगत सराव सत्र सोडून जात असल्याचे कळवले आहे.
हुडाने बीसीसीआयला याबात सविस्तर ईमेल पाठवली आहे. प्रशिक्षकांच्या परवानगीनेच हुडा सराव करत होता. त्यावेळी पंड्या व त्याच्यात अचानक वाद सुरु झाला. यामागचे कारण समजले नसले तरीही हुडाने सराव सोडून जाण्याचा पवित्रा घेतल्याने निश्चितच काहीतरी गंभीर घडले असल्याची चर्चा आहे. आता याबाबत बीसीसीआय काय कारवाई करणार त्यावरच हुडाचा या स्पर्धेतील सहभाग निश्चित होणार आहे. अर्थात कारण काहीही असले तरीही या दोघांतील वादामुळे देशांतर्गत क्रिकेटच्या मोसमातील पहिल्याच स्पर्धेला वादाची किनार लागली गेली.