नवी दिल्ली – राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावर निकाल दिल्यानंतर पहिल्यांदाच सर्वोच्च न्यायालयात आमदार अपात्रतेच्या प्रकरणी मंगळवार, दि. 16 जानेवारी रोजी सुनावणी होण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयात शिवसेना आणि राष्ट्रवादी अशी एकत्रित आमदार अपात्रता प्रकरणावर सुनावणी सुरु आहे. दरम्यान, राहुल नार्वेकर यांच्या निकालानंतर ठाकरे गटाकडून अद्याप नवीन याचिका दाखल करण्यात आलेली नाही.
राहुल नार्वेकर यांनी कोणालाही अपात्र न करता शिवसेना हा पक्ष शिंदेंना दिला. त्यानंतर ठाकरे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याची भूमिका जाहीर करण्यात आली.
पण अद्याप राहुल नार्वेकरांच्या निकालाला आव्हान देणारी याचिका ठाकरे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली नाही. त्यामुळे जर 16 जानेवारी रोजी सुनावणी झाल्यास ही सुनावणी शिवसेना आणि राष्ट्रवादी यांची एकत्रित आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर होईल.
शरद पवार गटाची धाकधूक वाढली
राहुल नार्वेकरांनी शिवसेनेबाबत निर्णय देताना पक्ष संघटनेपेक्षा विधीमंडळातील बहुमताचा विचार केला. त्यामुळे ठाकरे गटाला धक्का तर बसला, पण राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाची धाकधूकही वाढली आहे. कारण विधिमंडळातील बहुमत हे सध्या अजित पवार गटाकडे आहे. राष्ट्रवादीच्या पक्ष आणि चिन्हावर अजित पवारांनी दावा केला असून हा वाद केंद्रीय निवडणूक आयोगात पोहोचला आहे. दोन्ही बाजूंकडून त्या संबंधित युक्तिवाद सुरू असून कागदपत्रेही जमा करण्यात आली आहेत. आता निवडणूक आयोग त्यावर काय निर्णय घेते, हे पाहावे लागेल.