नवी दिल्ली – सत्येंद्र जैन यांच्यापाठोपाठ दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनाही तुरुंगात पाठवले जाण्याची भीती दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी व्यक्त केली आहे. अरविंद केजरीवाल यांनी गुरुवारी व्हर्च्युअल कॉन्फरन्सद्वारे ही भीती व्यक्त केली.
सत्येंद्र जैन यांना अटक होणार असल्याचे सांगणाऱ्या सूत्रांनी आता मनीष सिसोदिया यांचा नंबर आसल्याचे म्हटले आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल म्हणाले, आम आदमी पक्षाच्या सर्व मंत्र्यांना तुरुंगात टाका. खोट्या प्रकरणात आता मनीष सिसोदिया यांनाही तुरुंगात पाठवण्याची तयारी सुरू आहे. सत्येंद्र जैन यांना खोट्या प्रकरणात केंद्र सरकार तुरुंगात पाठवणार आहे, असे मी काही महिन्यांपूर्वी सांगितले होते. केंद्र सरकार मनीष सिसोदिया यांनाही तुरुंगात पाठवणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाल्याचे केजरीवाल यांनी म्हटलं आहे.
मनीष सिसोदिया हे स्वतंत्र भारताचे आतापर्यंतचे सर्वोत्तम शिक्षण मंत्री आहेत. दिल्लीत शैक्षणिक क्रांती घडवून आणण्याचे काम त्यांनी केले आहे. मला दिल्लीतील 18 लाख सरकारी शाळांमधील मुलांना विचारायचे की तुमचे शिक्षणमंत्री भ्रष्ट आहेत का? मला त्यांच्या कुटुंबीयांनाही विचारायचे आहे की, तुम्हाला सिसोदिया भ्रष्ट वाटतात का? केंद्र सरकारवर हल्लाबोल करताना केजरीवाल म्हणाले की, तुम्ही कितीही छापे टाकले तरी आम्ही काम करत राहू.
केजरीवाल पुढं म्हणाले, “केंद्र सरकारने सर्व एजन्सींना मनीष सिसोदियाविरुद्ध काही खोटे खटले तयार करण्यास सांगितले असल्याचे कळते. सत्येंद्र जैन यांच्यावर जसा खोटा खटला बनवला गेला, तसाच मनीषही सिसोदिया यांच्याविरुद्ध खोटी केस बनवत आहे. मला वाटतं सत्येंद्र जैन आणि मनीष सिसोदिया यांना खोट्या खटल्यांमध्ये तुरुंगात टाकून या लोकांना दिल्लीत शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात सुरू असलेले चांगले काम थांबवायचे असल्याचा आरोपही केजरीवाल यांनी केला.