म्हैसूर – लग्नाच्या तब्बल ९ वर्षानंतर मांड्या येथील डोड्डेनहल्ली गावातील नंजुंडे गौडा आणि ममता या दाम्पत्याच्या घरात एका चिमुरड्याचं आगमण होणार होतं. त्यासाठी मोठ्या उत्साहाने तयारी सुरू होती. करोना महामारीच्या काळात हे दाम्पत्य संपूर्ण काळजी घेत होतं. त्यानुसार ११ मे रोजी दाम्पत्याच्या घरात एका मुलीने जन्म घेतला. त्यामुळे संपूर्ण कुटुंब आनंदी होतं. मात्र या मुलीने व्यवस्थित डोळे उघडण्याआधीच करोनाने तिच्या माता-पित्याला हिरावलं.
४५ वर्षीय नंजुंडे गौडा यांचं ३० एप्रिल रोजी बंगळुरू येथे करोनावर उपचार सुरू असताना मृत्यू झाला. तर ३१ वर्षीय ममता यांचं मुलीला जन्म दिल्यानंतर चार दिवसांनी निधन झालं. ममता यांचा करोना अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर उपचार आणि डिलीव्हरीसाठी त्यांना मांड्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होते. त्यांनी ११ मे रोजी बाळाला जन्म दिला. मात्र करोनामुळे ममता यांचा मृत्यू झाला.
ममता आणि नंजुंडे यांचा विवाह ९ वर्षांपूर्वी झाला होता. लग्नानंतर त्यांना लगेच आपत्य झालं नाही. तब्बल ९ वर्षांनी त्यांच्या घरात पाळणा हलणार होता. त्यामुळे दोघंही आनंदी होते. मात्र दोघही करोनाचे बळी ठरले.
दरम्यान नुकत्याच जन्मलेल्या मुलीला ममताच्या भावांनी दत्तक घेतलं आहे. शनिवारी या कुटुंबाची तहसीलदारांनी भेट घेतली. तसेच त्यांना १० हजारांची मदत करत मुलीच्या पालनापोषणासाठी हवी ती मदत करण्याची हमी दिली. मुलीवर सध्या मांड्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे.