गाझा – हमासचे गनिम आणि इस्रायलचे लष्कर ( Palestine-Israel conflict ) या दोन्ही बाजूंनी एकमेकांच्या हद्दीतील हल्ले अजूनही सुरूच असून गाझाच्या हद्दीतून इस्रायलच्या हद्दीत करण्यात आलेलेल्या रॉकेट हल्ल्यात दोन जण ठार आणि तेरा जण जखमी झाले आहेत तर आज सकाळी इस्रायलने गाझाच्या हद्दीत केलेल्या हवाई हल्ल्यात सहा जण ठार झाले.
गेल्या काही दिवसांपासून झालेल्या या हल्ल्यांमध्ये अनेक इमारतींचीही पडझड झाली आहे.
इस्रायली लष्कराकडून मिळालेल्या माहितीनुसार, त्यांच्या हवाईदलाच्या 52 विमानांनी हमासच्या 40 अंडरग्राऊंड ठिकाणांवर 25 मिनिटांच्या अवधीत तुफानी हल्ले करून हलकल्लोळ माजवला. ( Palestine-Israel conflict )
खान युनिस आणि रफा या या भागात हे हल्ले झाले. या हल्ल्यांमध्ये एक महिला ठार झाली तर आठ जण जखमी झाले आहेत. हमास तर्फे चालवल्या जाणाऱ्या रेडिओवरील वृत्तानुसार एक वार्ताहरही या हल्ल्यांमध्ये ठार झाला आहे. शिफा हॉस्पिटलमधील एका डॉक्टरने सांगितले की, आज बुधवारी सकाळी आमच्या रुग्णालयात पाच मृतदेह आणण्यात आले आहेत.
दरम्यान, अमेरिकेने इस्रायलला हे हवाईहल्ले थांबवण्याची सूचना केली आहे पण त्याला अजून इस्रायलने विधायक प्रतिसाद दिलेला नाही. इजिप्तनेही दोन्ही बाजूंमध्ये तडजोड घडवून आणण्याचे प्रयत्न चालवला आहे. या दोन्ही बाजूंना चर्चेच्या टेबलावर आणण्यासाठी व्यापक आंतरराष्ट्रीय दबाव आणण्याची गरज आहे असे इजिप्तच्या अधिकाऱ्याने म्हटले आहे.
गाझापट्टीवर हमास या इस्लामिक कट्टरपंथीयांचे सरकार आहे. त्यांच्या गनिमांनी 10 मे रोजी इस्रायली हद्दीत रॉकेट्स फेकल्याने हा संघर्ष सुरू झाला आहे. जेरूसलेमच्या अल अक्सा मशिदीत जाणाऱ्या स्थानिक पॅलेस्टाइन नागरिकांवर तेथील सैनिक व पोलिसांनी दादागिरी सुरू केल्याने त्याचा बदला घेण्यासाठी म्हणून हमासने ही रॉकेट्स फेकल्याचे सांगण्यात येते. ( Palestine-Israel conflict )