रायचुर (कर्नाटक) – बेंगळूरुमधील लोकसभेची आणि बसवकल्याण, सिंदगी आणि मस्की या विधानसभेच्या जागांवर होणाऱ्या पोटनिवडणुका धर्मनिरपेक्ष जनता दल लढवणार नाही, असे धर्मनिरपेक्ष जनता दलाचे ज्येष्ठ नेते एच.डी. देवेगौडा यांनी सांगितले आहे. या पोटनिवडणुकांचे वेळापत्रक निवडणूक आयोगाकडून जाहीर केले जाणे अपेक्षित आहे.
या पोटनिवडणूका लढवण्यासाठी धर्मनिरपेक्ष जनता दलाकडे पैसे नाहीत. त्यामुळे ही पोटनिवडणूक आमच्या पक्षाकडून लढवली जाणार नाही. 2023 च्या विधानसभा निवडणूकीसाठी पक्षाची संघटना मजूबत करण्यासाठी आणि उभारणीत ते स्वत: ला पूर्णपणे गुंतवतील. पक्षाचे कार्यकर्ते आणि नेत्यांच्या मदतीने पक्ष अधिक समर्थ करण्यावरच लक्ष केंद्रीत केले जाईल, असे देवेगौडा यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
केंद्रीय मंत्री सुरेश आंगडी आणि आमदार बी. नारायण राव यांच्या निधनामुळे बेळगाव येथील लोकसभेची आणि बसवकल्याण येथील विधानसभेची जागा रिक्त झाली आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरपासून रिक्त असलेल्या या जागांवर करोनाच्या निर्बंधांमुळे पोटनिवडणूक होऊ शकलेली नाही. तर आमदार प्रतापगौडा पाटील यांना अपात्र ठरवले गेल्यामुळे मस्की येथील विधानसभेची जागाही रिक्त झाली आहे. कॉंग्रेसकडून निवडून आलेले पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. सिंदगीचे “जेडिएस’चे आमदार एम.सी. मनागुळी यांचे गेल्या महिन्यात निधन झाल्यामुळे तेथील जागाही रिक्त झाली आहे.
तामिळनाडू, केरळ, पश्चिम बंगाल, आसाम ही चार राज्ये आणि पुद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशांच्या विधानसभेची मुदत यावर्षी समाप्त होत आहे. या सर्व ठिकाणी एप्रिल महिन्यात विधानसभेच्या निवडणूका होणे अपेक्षित आहे.