पुणे – पाणी आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. पुरेशा प्रमाणात पाणी प्यायल्याने अनेक आजारांपासून बचाव होतो आणि शरीर निरोगी राहते. मात्र, अनेकांनी असा प्रश्न पडतो की, दिवसभरात किती प्रमाणात पाणी प्यावे? हायड्रेट राहण्यासाठी सतत थोड्या-थोड्या वेळाने पाणी प्यावे, हे आपण अनेकदा ऐकलेल असतं.
‘डिहायड्रेशन’ ही अशी समस्या आहे, की जी सतत निर्माण होत असेल व त्याचे दुष्परिणाम शरीरावर होऊ शकतात. सतत डिहायड्रेशन झाल्यास थकवा, मळमळणं, चक्कर येणं, असे प्रकार होऊ शकतात. त्यामुळे अशक्तपणा देखील येऊ शकतो. दिवसभरात सतत पाणी पिणं फार गरजेचे आहे. दररोज किमान 2-3 लीटर पाणी तरी प्यायला हवं. त्यामुळे तुमचे आरोग्य चांगले राहते.
मात्र, कधी कधी जास्त पाणी पिणे देखील तुमच्या अंगलट येऊ शकते. असाच काहीसा प्रकार अमेरिकेतील एका महिले सोबत घडला आहे. जास्त पाणी प्यायल्याने महिलेच्या पोटात विष तयार होऊन तिचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. ‘ऍशले समर्स’ असं या महिलेच नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ऍशले समर्स ही आपल्या कुटुंबासोबत मॉन्टीसेलो जवळील लेक फ्रीमन येथे सुट्टीसाठी गेली होती, तिथे अचानक तिची तब्येत बिघडली. तिला चक्कर येऊ लागली, डोकेदुखी सुरू झाली आणि तहान लागल्याची तक्रारही केली. अशा स्थितीत तिने काहीही विचार न करता पाणी पिण्यास सुरुवात केली आणि सुमारे 20 मिनिटांत अर्धा लिटर पाण्याच्या चार बाटल्या एक-एक करून प्यायल्या. संध्याकाळी घरी पोहोचल्यावर ती बेशुद्ध पडली.
यानंतर कुटुंबीयांनी तिला तातडीने रुग्णालयात नेले, मात्र दुर्दैवाने तिचा मृत्यू झाला होता. गरजेपेक्षा जास्त पाणी प्यायल्याने तिच्या शरीरात पाण्याचं विष तयार झालं आणि मेंदूला सूज आली अशी माहिती डॉक्टरांनी दिली. महिलेच्या शरीरात खूप पाणी होतं, पण सोडियम पुरेस नव्हतं, असंही डॉक्टरांनी यावेळी सांगितलं. त्यामुळे प्रमाण पेक्षा जास्त पाणी पिणं देखील तुमच्या अंगलट येऊ शकते.