काबूल – अफगाणिस्तानची राजधानी काबूलमधील एका मशिदीत काल झालेल्या बॉम्बस्फोटात किमान 21 जण ठार आणि 33 जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये काही लहान मुलेही आहेत. तर मरण पावणाऱ्यांमध्ये मशिदीच्या मौलवीचाही समावेश आहे. काबूल शहरातील खेर खाना भागातील सिद्दीकीया मशिदीमध्ये संध्याकाळची प्रार्थना संपण्याच्यावेळी हा बॉम्बस्फोट झाला.
हा एक आत्मघातकी बॉम्बस्फोट होता, असे प्रत्यक्ष साक्षीदारांनी सांगितले. स्फोटातील मृतांची संख्या अधिक असण्याची शक्यता एका अन्य साक्षीदाराने व्यक्त केली. आतापर्यंत या बॉम्बस्फोटाची जबाबदारी कोणत्याही दहशतवादी संघटनेने घेतलेली नाही. मात्र हा स्फोट इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेने केला असल्याचा संशय व्यक्त करण्यात येतो आहे.
तालिबानने अफगाणिस्तानची सत्ता ताब्यात घेतल्याला एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर लगेचच हा बॉम्ब हल्ला करण्यात आला. अफगाणिस्तानमध्ये इस्लामिक स्टेट आणि तालिबानमध्ये तणाव निर्माण झाला आहे. इसिसने यापूर्वीही तालिबानविरोधात असे हल्ले केले आहेत. काबूलमध्ये तालिबानच्या प्रमुख धार्मिक नेत्याच्या हत्येची जबाबदारी इसिसने स्विकारली होती. तालिबानचा प्रवक्ता झबिबुल्लाह मुजाहिद यानेही काल झालेल्या बॉम्ब हल्ल्याचा निषेध केला आहे. या हल्ल्यामागील सूत्रधारांना शिक्षा केली जाईल, असा विश्वासही त्याने व्यक्त केला.