विजय सपकाळ
मेढा – माध्यमिक विद्यालयांमध्ये विज्ञान प्रदर्शनाचे उपक्रम राबविले जातात. त्यामध्ये अन्नधान्यातील भेसळ हा एक उपक्रम निश्चित असतो. त्यामध्ये मसाल्याच्या पदार्थातील मिरीमध्ये पपईच्या बिया, दालचिनीमध्ये लाकडाची साल मिसळून होणारी भेसळ कशी ओळखायची याचे ज्ञान दिले जायचे. अगदी तसेच अलिकडच्या काळात प्लॅस्टिकचे अंडे, प्लॅस्टिकचा गहू बाजारात असल्याचीही चर्चा होते. त्यानंतर आज चक्क प्लॅस्टिकचा तांदूळ सरकारच्या रेशन धान्यातही भेसळ केला जात असल्याचा प्रकार उघडकीस आल्याने सामान्यांपुढे नवी समस्या निर्माण होण्याची चिन्हे आहेत.
जावळी तालुक्यातील आंबेघर तर्फ मेढा हे छोटंस गाव. याच गावातील शिधापत्रिकाधारक चंदर दगडू शेलार आणि रत्नाबाई चंदर शेलार यांच्या रेशनिंग धान्यातील आठ किलो तांदळात थोडे थोडके नव्हे तर अर्धा किलो प्लॅस्टिकचे तांदूळ आढळून आले असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले. त्यामुळे याबाबत शासनाच्यावतीने पडताळणी करुन संबंधित प्रकाराच्या मुळाशी जाऊन छडा लावण्याची गरज निर्माण झाली आहे.
यापूर्वी प्लॅस्टिकचे अंडे, प्लॅस्टिकचा गहू याबाबत माध्यमांद्वारे नागरिकांना जागरुक केले जायचे. पण, आता चक्क प्लॅस्टिकचा तांदूळ ग्रामीण भागातील घराघरांपर्यंत पोचायला लागल्यावर ही गंभीर बाब ऐकून काळजात धस्स झाल्याशिवाय राहत नाही. अरे देवा… आज नीट पाहिलं म्हणून आज या रेशनिंगमधून मिळणाऱ्या तांदळात प्लॅस्टिकचेही तांदूळ येतात हे समजले. यापूर्वी प्लॅस्टिकचा किती तांदूळ पोटात गेला असेल देव जाणे, अशी प्रतिक्रिया शेलार कुटुंबीयांनी दिली.
आंबेघर तर्फ मेढा येथील चंदर दगडू शेलार आणि रत्नाबाई शेलार यांच्या कुटुंबाला या महिन्यात आठ किलो तांदूळ मिळाल्यावर आश्चर्याची बाब म्हणजे त्यामध्ये अर्धा किलो प्लॅस्टिकचे तांदूळ सापडले. त्यांनी ही बाब आंबेघर येथील सामाजिक कार्यकर्ते जगन्नाथ जाधव यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यांनी याबाबत खात्री करुन दुसऱ्या कुटुंबातील रेशनिंगच्या तांदळाबाबत माहिती घेतली. तर तेथेही त्यांना तसाच प्रकार पाहयला मिळाला. त्यामुळे त्यांनी हा प्रकार “प्रभात’च्या प्रतिनिधींच्या निदर्शनास आणला. या प्लॅस्टिकच्या तांदळाची जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी करावी, अशी मागणी या कुटुंबीयांनी केली आहे.
धान्याचा पुरवठा एकाच ठिकाणाहून होतो. त्यामुळे धान्य हे चांगलेच उपलब्ध असते. मात्र, रेशनच्या तांदळात प्लॅस्टिकच्या तांदळाच्या भेसळीच्या तक्रारीबाबत माहिती घेण्यात येईल.
हणमंत कोळेकर , नवनियुक्त तहसीलदार, जावळी