वॉशिंग्टन : शालेय पातळीपर्यंत चांगले शिक्षण घेऊन नंतर करिअर घडवण्यासाठी मोठ्या महाविद्यालयामध्ये ऍडमिशन मिळवणे हे सर्वांचे स्वप्न असते. त्यासाठी सर्वजण अथक प्रयत्न करत असतात या प्रयत्नांना यश मिळणे म्हणजे काय याचा अनुभव लुईजाना प्रांतातील एका सोळा वर्षे वयाच्या विद्यार्थ्याला मिळाला आहे.
न्यू ओरलीनसमधील इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकणाऱ्या सोळा वर्षीय डेनिस बार्न्स या विद्यार्थ्याला उच्च शिक्षणासाठी तब्बल 170 महाविद्यालयातून ऍडमिशनच्या ऑफर्स आल्या असून त्याशिवाय त्याला 90 लाख डॉलरच्या शिष्यवृत्तीचीही ऑफर झाली आहे. डेनिसच्या या पराक्रमाची दखल गिनीज बुकनेही घेतली असून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये या विक्रमाची नोंद करण्यात आली आहे.
ऑगस्ट 2022 मध्ये डेनिसने विविध महाविद्यालयांमध्ये प्रवेश प्रक्रियेसाठी अर्ज करायला सुरुवात केली होती. त्यावेळी त्याचा प्रत्येक अर्ज मंजूर जसजसा व्हायला लागला. तसतशी त्याला त्याची गंमत वाटली आणि अजून काही ठिकाणी त्याने अर्ज करायला सुरुवात केली. याबाबत आपण विक्रम करू असे त्याच्या लक्षात आल्यावर त्याने जास्तीत जास्त ठिकाणी ऍडमिशन घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले.
डेनिस अभ्यासात अतिशय हुशार असून त्याला ज्या महाविद्यालयांचे ऍडमिशनचे प्रस्ताव आले आहेत. त्यापैकी कोणत्या महाविद्यालयात उच्च शिक्षणासाठी प्रवेश घ्यायचा हे त्याने अद्याप ठरवलेले नाही. मात्र कॉम्प्युटर सायन्सच्या क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय मात्र त्याने घेतला आहे. कॉम्प्युटर सायन्सचे शिक्षण पूर्ण केल्यावर कायदा विषयाची पदवी घेण्याचे त्याने ठरवले आहे.