ब्लिट्‌झ बुद्धिबळ स्पर्धेत आदित्य सामंत विजेता

पुणे: आदित्य सामंतने अनेक अनपेक्षित निकाल नोंदवित ब्लिट्‌झ बुद्धिबळ स्पर्धेत अजिंक्‍यपदाला गवसणी घातली. ही स्पर्धा बुद्धिबळ क्रीडा ट्रस्टतर्फे आयोजित करण्यात आली होती. महिला ग्रॅंडमास्टर सौम्या स्वामीनाथन, आंतरराष्ट्रीय मास्टर अभिषेक केळकर, फिडे मास्टर निखिल दीक्षित, अनिरूद्ध देशपांडे, गौरव बाकलीवाल, चिन्मय कुलकर्णी, महिला आंतरराष्ट्रीय मास्टर सलोनी सपाळे आदी 57 मानांकित खेळाडूंसह 106 खेळाडूंनी भाग घेतला होता. त्यामुळे विजेतेपदाबाबत उत्कंठा निर्माण झाली होती.

आदित्यने या स्पर्धेच्या आठ फेऱ्यांमध्ये अनेक आश्‍चर्यजनक निकालांची नोंद केली. तो व सौम्या यांचे प्रत्येकी 7 गुण झाले. प्रगत गुणांच्या आधारे आदित्यला प्रथम तर सौम्यास द्वितीय स्थान देण्यात आले. दीक्षितने साडेसहा गुणांसह तिसरा क्रमांक मिळविला. सोहम दातार व आर्यन सिंगाला यांनी अनुक्रमे चौथा व पाचवा क्रमांक मिळविला. 60 वर्षावरील गटात चंद्रकांत डोंगरे, गिरीश जोशी व रवी बेहेरे यांनी अनुक्रमे पहिली तीन पारितोषिके जिंकली. महिलांमध्ये हा मान सुप्रिया जोशी, सपाळे व निहिरा कौल यांना मिळाला. तेराशेपेक्षा कमी मानांकन असलेल्या खेळाडूंच्या गटात कुशाग्र जैनला विजेतेपद मिळाले तर शिवम पांचाळ व रोहन ढोरे यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय स्थान मिळविले. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ क्रीडा संघटक संजय आढाव, प्रकाश कुंटे, केदार पळसुले यांच्या हस्ते झाला. ईशान वरूडकर, प्रथमेश शेर्ला आदी खेळाडूंना विशेष बक्षीसे देण्यात आली.

स्पर्धेतील अन्य निकाल-बिगर मानांकित खेळाडू-1.वैभव जोशी, 2.गौरव हगवणे, 3. अनिल शर्मा. दहा वर्षाखालील खेळाडू-1.अक्षय बोरगावकर, 2.मानस तावरे, 3.कपिल इर्कुलिया. आठ वर्षाखालील-1. कोमल गोरे, 2.वरद नांदुरकर, 3. पुनित ठाकूर.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)