दिल्लीत वाहतूकदारांच्या संपामुळे शाळा, खासगी कंपन्यांना सुटी

नवी दिल्ली : सुधारित मोटार वाहन कायद्यातील दंडाच्या रकमेविरोधात आता वाहतूक संघटनांनी आवाज उठविण्यास सुरुवात केली आहे. दिल्ली आणि नोएडामध्ये गुरुवारी वाहतूक संघटनांनी एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारला आहे. त्यामुळे संपाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये अनेक खासगी शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर काही खासगी कंपन्यांनी गुरुवारी कर्मचाऱ्यांसाठी सुटी जाहीर केली होती.

दिल्लीमध्ये रिक्षा, प्रवासी वाहतूक करणाऱ्या कार, ऍप आधारित कार सेवा, ट्रक, शाळेच्या बस या सर्व गाड्या बंद राहणार आहेत. त्यामुळे चाकरमान्यांना घरापासून ऑफिसपर्यंत जाणे अवघड होणार आहे. दिल्लीतील मेट्रोसेवा सुरळीत आहे. एकूण 41 संघटना या संपांमध्ये सहभागी झाल्या आहेत. गुरुवारी सकाळी सहा वाजल्यापासून रात्री साडेनऊ वाजेपर्यंत कोणतीही प्रवासी वाहतूक करणारी सेवा दिल्लीमध्ये सुरू राहणार नाही, असे संघटनेने निश्‍चित केले आहे.
सुधारित मोटार वाहन कायद्यामध्ये जी दंडाची रक्कम वाढविण्यात आली आहे त्याचा तातडीने पुनर्विचार केला जावा. केवळ दंडाची रक्कम वाढविण्यात आली आहे. पण पायाभूत सुविधांकडे सरकारचे अजिबात लक्ष नाही, असे संघटनेने म्हटले आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×