संतोष पवार
सातारा – जिल्हा परिषदेच्या आरक्षण सोडतीत अनेक विद्यमान पदाधिकाऱ्यांसह सर्वपक्षीय नेत्यांचा पत्ता कट झाला आहे. जिल्हा परिषदेत आता नवे चेहरे दिसणार असून 73 पैकी 37 जागांवर महिलाराज असणार आहे. आरक्षण सोडतीचा अनेक दिग्गजांना फटका बसला असून सर्वमान्य उमेदवार शोधण्याचे सर्वच पक्षांपुढे आव्हान उभे राहिले आहे.
जिल्हा परिषदेच्या 73 गटांसाठी आरक्षण सोडत गुरुवारी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी उपजिल्हाधिकारी प्रशांत आवटी यांच्यासह विविध पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते. अनुसुचित जाती प्रवर्गासाठी आठ जागा राखीव असून त्यापैकी चार जागांवर महिलांचे आरक्षण आहे. अनुसुचित जमातीसाठी केंजळ (ता. वाई) या गटाचे आरक्षण पडले आहे.
नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी 19 जागा आरक्षित होत्या त्यापैकी 10 जागांवर महिलांना संधी मिळाली आहे. सर्वसाधारण 45 जागांपैकी 23 जागांवर महिलांना संधी मिळाली आहे. सलग चार निवडणुकांमध्ये ओबीसी आरक्षण न पडलेल्या 9 गटांमध्ये ओबीसी आरक्षण पडले आहे. कराड तालुक्यात मसूर गटातून माजी शिक्षण सभापती मानसिंगराव जगदाळे यांना पुन्हा संधी मिळाली आहे.
अन्य गटात मात्र बहुतांश ठिकाणी नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार आहे. माण तालुक्यातून महिला व बालकल्याण विभागाच्या माजी सभापती सौ. सोनाली पोळ, भारती पोळ यांना पुन्हा संधी मिळाली आहे. अरुण गोरे यांची संधी मात्र हुकणार आहे. अनिल देसाई यांच्या भावजय अरुणा देसाई यांनाही पुन्हा संधी मिळणार आहे. वाई तालुक्यातील पाच गटांपैकी केंजळ अनुसुचित जमाती तर बावधन गट अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाला आहे. महादेव मस्कर, शशिकांत पिसाळ यांना मात्र हुलकावणी मिळाली आहे.
कोरेगाव तालुक्याच्या आरक्षण सोडतीत माजी सभापती मंगेश धुमाळ, भीमरावकाका पाटील यांना धक्का बसला आहे. पिंपोडे बुद्रुक गटात ओबीसी आरक्षण पडल्याने राष्ट्रवादीतील इच्छुकांमधील संघर्ष मिटण्याची शक्यता आहे. सातारारोड गटात अनुसूचित जातीसाठी आरक्षण पडल्याने इच्छुकांच्या पदरी निराशा आली आहे. वसंतराव मानकुमरे, दीपक पवार, अर्चना राजंणे यांना आरक्षणाने धक्का दिला असून जावळीत आता नवीन चेहरे दिसणार आहेत. सातारा तालुक्यातही अनेक दिग्गजांना फटका बसला असून प्रतीक कदम यांची मात्र कोंडवे गटातून लॉटरी लागली आहे. लिंब गटातून कोण लढणार याचीही उत्सुकता लागून राहिली आहे. पाटण तालुक्यात सत्यजितसिंह पाटणकर आणि आ. शंभूराज देसाई यांच्या गटात जोरदार रस्सीखेच होणार आहे. आरक्षणाने “कही खुशी कही गम’ अशी परिस्थिती आहे.
या दिग्गजांची संधी हुकली
जिल्हा परिषद आरक्षण सोडतीत जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष उदय कबुले, माजी उपाध्यक्ष प्रदीप विधाते, माजी कृषी सभापती मंगेश धुमाळ, माजी समाजकल्याण सभापती कल्पना खाडे, वसंतराव मानकुमरे, दीपक पवार, अर्चना रांजणे, सौरभ शिंदे, मनोज पवार, शिवाजी सर्वगौड, दीपाली साळुंखे, अरुण गोरे, भाग्यश्री भाग्यवंत, भीमरावकाका पाटील, शशिकांत पिसाळ, महादेव मस्कर, शशिकांत पवार, प्रकाश चव्हाण, बापूराव जाधव, राजू भोसले, विक्रम पवार, शशिकांत वायकर, जितेंद्र सावंत, राहुल शिंदे, अर्चना देशमुख, देवराज पाटील, निवास थोरात, सागर शिवदास, उदयसिंह पाटील, राजाभाऊ उंडाळकर, अनिता चोरगे, मधू कांबळे, राजेश पवार, संजय देसाई, रमेश पाटील, जयश्री फाळके, डॉ. अभय तावरे, नागेश जाधव, विराज शिंदे, जगदीश जगताप, जयवंत जगताप, प्रदीप पाटील या दिग्गजांची संधी हुकली आहे. जिल्हा बॅंकेचे विद्यमान संचालक प्रदीप विधाते यांच्या खटाव गटात सर्वसाधारण आरक्षण पडले असल्याने ते निवडणूक लढवू शकतात.