मोफत दूध वाटपासाठी सरसावले कार्यकर्ते

अकोले  -करोनामुळे सर्वसामान्य जनजीवनावर मोठा प्रभाव पडला आहे. या पार्श्‍वभूमीवर दूध संकलन करण्याला सहकारी संस्था व खाजगी संस्थांनी आखडता हात घेतला आहे. त्यामुळे उत्पादित दूध मोफत वाटून काहींनी इष्ट पायंडा पाडण्यासाठी पुढाकार घेतला आहे. देश ते गल्लीपातळीवर लॉकडाऊटची अंमलबजावणी कडेकोट पणे सुरु आहे.

दररोज मात्र शेतकरी वर्गाला दूध काढून सहकारी दूध संस्थांना किंवा खाजगी संस्थांना पुरवण्यासाठी आटापिटा करावा लागत आहे. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून या दूध संकलन करण्याच्या प्रक्रियेला अडथळा येऊ लागला आहे. अकोले तालुका अमृतसागर दूध प्रक्रिया व व्यावसायिक संघाने निवेदन जाहीर करून दूध संकलन करण्याला 30 मार्चपासून हात आखडता घेतला आहे. त्यामुळे उत्पादित दूध आणि घराची गरज यांचा ताळमेळ बसत नाही. त्यामुळे उदार दृष्टिकोन ठेवून समाजातील वंचित घटकांना याचा मोफत वाटप करून लाभ देण्याचे धोरण काहीनी स्वीकारले आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे युवा कार्यकर्ता संदीप भाऊसाहेब शेणकर व संतोष कारभारी नाईकवाडी यांनी अगस्ती साखर कारखाना अगस्तीनगर येथील कामगार वसाहत येथे मोफत 200 लिटर दुधाचे वाटप करुन संकटकाळी देशाप्रती व समाजाप्रती असलेले कर्तव्य बजावल्यामुळे कारखाना वसाहत व परिसरात समाधान पसरले आहे.

तिकडे असे चित्र दिसत असताना दुसरीकडे मात्र, काही व्यवसायिक दृष्टीने दूध धंद्याकडे पाहणाऱ्या व्यक्‍ती हे दूध किमान तीस रुपये लिटर प्रमाणे ही देण्यासाठी चंग बांधला आहे. एकीकडे मोफत वाटप तर दुसरीकडे विक्री करून दुधाचे वाटप असे परस्पर विसंगत चित्र अकोले सारख्या ठिकाणी दिसू लागले आहे. मात्र दुधासारखा नाशवंत द्रव्य पदार्थ हा घरी ठेवणे जोखमीचेच नाही तर प्रत्येक शेतकऱ्यांच्या अवाक्‍या पलीकडची बाब असल्याने अनेकांनी दूध वाटप करण्याला प्राधान्य दिले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.