नवी दिल्ली : जगात करोनाने थैमान घातले आहे. अमेरिका, स्पेन आणि इटलीमध्ये तर या आजाराने चांगलाच हैदोस घातला आहे. या सर्वात बेल्जियममधील एका ९० वर्षीय करोनाग्रस्त महिलेने उपचार करण्यास नकार दिल्याने तिचा मत्यू झाला असल्याची घटना सामोर आली आहे. मात्र तिच्यामृत्यू मागील एक सत्य आता समोर आले आहे. डॉक्टरांनी माझ्यासाठी व्हेंटीलेटर वापरण्याऐवजी तरुण रुग्णांसाठी तो ठेवावा असे सांगत या महिलेने उपचारांना नकार दिल्याचे एक वृत्तवाहिनीने म्हटले आहे.
लुबेक येथील बिनकोम शहरातील सुझॅन होलर्ट्स या महिलेला तिची मुलगी जुडीथ डॉक्टरांकडे घेऊन आली. सुझॅन यांना भूक लागत नव्हती तसेच श्वास घेण्यास त्रास होत होता. सुझॅन यांची करोना चाचणी घेण्यात आली ती पॉझिटीव्ह निघाली. करोना झाल्याचे सिद्ध झाल्यामुळे सुझॅन यांना विलगीकरणात ठेवण्यात आला. त्यांना कोणालाही भेटू दिले जात नव्हते. “माझ्यासाठी कृत्रिम श्वसन यंत्रणा वापरु नका. जी यंत्रणा माझ्यासाठी वापरणार होते तिचा एखाद्या तरुण रुग्णासाठी त्याचा वापर करा. मी माझं आयुष्य छान जगले आहे,” असे सुझॅन यांनी डॉक्टरांना सांगितले.
सुझॅन यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यांचा २२ मार्च रोजी मृत्यू झाला, असं स्थानिक वृत्तपत्रांनी म्हटलं आहे. सुझॅन यांची मुलगी जुडीथ हिने दिलेल्या माहितीनुसार सुझॅन यांना मागील वर्षी न्युमोनिया झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होता. सुझॅन या एकट्या रहायच्या. तिने लॉकडाउन गांभीर्याने घेत घराबाहेर पाऊलही ठेवलं नव्हतं. तरी तिला करोना कसा झाला हाच प्रश्न आम्हाला पडला आहे, असं जुडीथ म्हणाली.
आईला विलगीकरणात ठेवण्याआधी तिच्याशी बोलणं झालं तेव्हा तीने मला, तू रडू नकोस तुला शक्य आहे ते सर्व तू माझ्यासाठी केलं आहे,असे सांगितल्याचे जुडीथ म्हणाली. आपल्याला तिला शेवटचं पाहता आले नाही तिच्या अंत्यसंस्कारालाही उपस्थित राहता आले नाही याची मला खंत आहे, असंही जुडीथ म्हणाली. बेल्जियममध्ये करोनाचे १० हजारहून अधिक रुग्ण अढळले. आहेत.