टोक्यो – येथे सुरु असलेल्या ऑलिंपिक स्पर्धेत महिला तलवारबाजी अर्थात फेन्सींगच्या मुकाबल्यात भारताच्या सी. ए. भवानीदेवीने लक्षणीय कामगिरी केली. चंदलवदा आनंदा सुब्रमणियम भवानी देवी असे तलवारीसारखेच लांबलचक नाव असलेल्या या खेळाडूने राऊंड ऑफ 64 मध्ये प्रथम विजय मिळवला.
भवानी देवीने पहिल्या फेरीत ट्युनिशियाच्या नादिया बेन अझिझी हिच्यावर 15-3 अशा गुणफरकाने मात केली. हा सामना अक्षरश: एकतर्फी झाला. भवानी देवीच्या आक्रमणापुढे नादियाचा टिकाव लागला नाही.
पुढे राऊंड ऑफ 32 घेण्यात आला. या मुकाबल्यात भवानी देवीची लढत अनुभवी आणि अग्रमानांकित फ्रान्सच्या मॅनन ब्रुनेटबरोबर होती. मॅननचा अनुभव आणि आक्रमणातील धार यापुढे भवानी देवीचे फारसे चालले नाही. हा सामना मॅन ब्रुनेटने 15-7 अशा गुणफरकाने जिंकला.
भारतासाठी जमेची बाजू इतकीच महिलांच्या फेन्सिंग मुकाबल्यात दोन फेऱ्यांपर्यंत खेळाडू पोहोचणे हे तसे दुर्मिळच मानले जाते.