पुणे – शहरातील अवैध धंदे आणि सराईत गुन्हेगारांसाठी विशेष मोहीम गुन्हे शाखेने राबवली होती. यामध्ये सराईत गुन्हेगारांची झाडाझडती घेण्याबरोबरच मर्यादेपेक्षा अधिक वेळ सुरू असणाऱ्या हॉटेल्स अन् पबवर कारवाईचा बडगा उचलला असून मर्यादेपेक्षा अधिक वेळ सुरू असणाऱ्या पंचतारांकित हॉटेल्ससह पबवर कारवाई करत त्यांच्यावर खटले दाखल करण्यात आले. या कारवाईत 1 लाख 8 हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
शहरातील कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी गुन्हे शाखेकडून अधून-मधून अचानक विशेष मोहीम राबविण्यात येते. वॉन्टेड आरोपी तसेच सराईत गुन्हेगारांची तपासणी केली जात आहे. उशिरापर्यंत सुरू असणाऱ्या हॉटेल्सवरही कारवाई करण्यात येत आहे. गुन्हे शाखेने मोहिमेत शहरातील 50 हून अधिक हॉटेल्स आणि पबची झाडाझडती घेतल्यानंतर त्यातील 27 आस्थापनांवर कारवाई करत खटले दाखल केले आहेत. तर 31 गुन्हेगारांना अटक करण्यात आली. गुन्हे शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त अशोक मोराळे व उपायुक्त बच्चन सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी विशेष मोहीम राबविली होती.