लंडन – आयपीएल स्पर्धेतील गुजराथ टायटन्सचा कोट्यवधिचा करार मिळाल्यानंतरही बायोबबलचे कारण देत स्पर्धेतून माघार घेत असल्याचे जाहिर करणार्या इंग्लंडच्या जेसन रॉयवर इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाने (ईसीबी) कठोर कारवाई केली आहे.
इंग्लंड मंडळाने त्याच्यावर दोन सामन्यांची बंदी घातली आहे. यंदाच्या आयपीएल स्पर्धेसाठी गुजरात टायटन्सने त्याला खरेदी केले होते. जेसन रॉयने बायो बबलचे कारण देत स्पर्धेतून माघार घेतली होती. ईसीबीने दोन सामन्यांच्या बंदीसह रॉयवर 2,500 यूरो इतका दंडही ठोठावला आहे.
गैरवर्तणुकीमुळे त्याच्यावर कारवाई केली असून त्याने आपल्या वर्तनात सुधारणा केली नाही तर ही बंदी 12 महिन्यांची केली जाऊ शकते. खेळाडूंवर शिस्तभंग समितीने जेसन रॉससंदर्भातील निर्णय घेतला आहे. जेसन रॉयने त्याच्यावर लावण्यात आलेले आरोप मान्यही केले आहेत. त्याने जी कृती केली आहे ती अयोग्य आहे. त्याच्या गैरवर्तनामुळे त्याची बदनामी तर होतेच. पण याशिवाय क्रिकेट आणि इंग्लंड मंडळाचे नावही खराब होते, असे इंग्लंड मंडळाने म्हटले आहे.
रॉयने मंडळाच्या नियमावलीतील 3.3 या नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.आयपीएलच्या लिलावात जेसन रॉयला गुजरात टायटन्सने दोन कोटी रुपयांत खरेदी केले होते.