वॉशिंग्टन – रशिया हा “जी-20’मधील एक महत्वाचा देश आहे आणि त्याची “जी-20′ मधून हकालपट्टी करता येऊ शकणार नाही, असे चीनने म्हटले आहे. रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर त्या देशाला जी-20 या आर्थिक प्रभावशाली देशांच्या गटामध्ये राहू द्यावे का, याबाबत अमेरिका आणि अन्य मित्र देशांकडून विचारविमर्श सुरू आहे. त्या पार्श्वभुमीवर चीनने ही प्रतिक्रिया दिली आहे.
जी-20 हे आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवहारासाठीचा महत्वाचे व्यासपीठ आहे. या व्यासपीठाचा रशिया हा महत्वाचा सदस्य आहे. कोणत्याही एका देशाची या गटामधून हकालपट्टी करण्याचा दुसऱ्या कोणत्याही देशाला अधिकार नाही, असे चीनचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते वॅंग यी यांनी म्हटले आहे.
रशियाकडून युक्रेनवर हल्ला होणे ही आंतरराष्ट्रीय संस्थांच्या घटक सदस्याकडून झालेली मनमानी आहे. आंतरराष्ट्रीय संघटनांमधील सदस्यांकडून अशा तऱ्हेचे वर्तन चालू शकणार नाही, असे अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलियन यांनी व्हाइट हाऊसमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.जी-20 मधील रशियाच्या सदस्यत्वाबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते.
मात्र रशियाच्या “जी-20′ मधील हकालपट्टीबाबत अन्य देशांशी चर्चा करणे आवश्यक आहे, असेही जेक सुलियन यांनी म्हटले आहे. अमेरिकेचे ध्यक्ष ज्यो बायडेन यांनी रशियाकडून तेल आणि गॅसची आयात करण्यावर बंदी जाहीर केली, तेंव्हाच अमेरिकेची भूमिका स्पष्ट झाल्याचेही त्यांनी सांगितले.