पुणे – लाल दिवा असो वा नसो; मात्र अधिकाऱ्यांच्या प्रामाणिक कामामुळेच राज्याची प्रगती होत असते. त्यामुळे नवनियुक्त अधिकाऱ्यांनी निवडीनंतरही अभ्यासाची प्रक्रिया ही निरंतर सुरू ठेवली पाहिजे. अधिकारी नाही तर लोकसेवक ही सकारात्मक भावना बाळगून संविधान व कायदा प्रमाण माणून काम केले पाहिजे, असा कानमंत्र निवृत्त सनदी अधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांनी आज येथे दिला.
द युनिक ऍकॅडमीतर्फे एमपीएससी निकालातील यशवंतांच्या सत्कार सोहळ्यात प्रमुख पाहुणे ते बोलत होते. पुणे ग्रामीणचे अपर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे, युनिक ऍकॅडमीचे संचालक तुकाराम जाधव यांच्यासह ऍकॅडमीमधील प्राध्यापक वर्ग, यशवंत अधिकारीसह स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांची मोठी उपस्थिती होती.
देशमुख म्हणाले, “2021 च्या एमपीएससी निकालात द युनिक ऍकॅडमीमधून मार्गदर्शन घेतलेल्या 230 विद्यार्थ्यांनी अंतिम यादीत स्थान मिळविले आहे. राज्यातील मागील काही वर्षांपासून उत्तम प्रशासकीय अधिकारी घडवण्याचे काम युनिक ऍकॅडमी करत आहे.’ “लहानपणापासून रहस्यकथा वाचायची आवड आणि आता जबाबदारी म्हणून गुन्ह्यांचा तपास कामाचा भाग झाल्याने मनापासून काम करण्याचा आनंद मिळतोय. तंत्रज्ञानाचा अवलंब हा अधिकाऱ्यांच्या कामासाठी आवश्यक झाला आहे,’ असे मितेश घट्टे यांनी सांगितले.
यावेळी युनिक प्रकाशित भारतीय राज्यघटना व घटनात्मक प्रक्रिया, इतिहास, भूगोल, भारतीय अर्थव्यवस्था व सामान्य विज्ञान या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी निवड झालेल्या उमेदवारांनी युनिकमधील शिक्षकांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरल्याचे सांगितले. महेश शिरापूरकर यांनी सूत्रसंचालन केले. तर, भारत पाटील यांनी आभार मानले. उपजिल्हाधिकारी तेजस्विनी अहेर यांनी एकत्र व शेतकरी कुटुंबातील असले तरी लहानपणापासून अधिकारी होण्याचे स्वप्न पाहिले.
लग्नासाठी कुटुंबाचा दबाव असतोच मात्र काका व कुटुंबीयांनी कायमच विश्वास दाखवला. कोविड काळ व अपयशानंतरही पुढच्या प्रयत्नात राज्यात पहिल्या पाचमध्ये येणार असा विश्वास दिला व तो सार्थ ठरवता आला, याबद्दल आनंत व्यक्त केला. युनिकमधील शिक्षकांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरल्याचेही तेजस्विनी यांनी सांगितले. डीवायएसपीपदी निवड झालेल्या पूजा पवार म्हणाल्या, शेतकरी आई वडिलांनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरवता आल्याचा आनंद आहे. वडिलांनी लहानपणी ज्या हातात खुरपं दिलं, पेन दिला तेच हात आता बंदूक हाताळणार आहेत, यासाठी आईवडिलांचा भक्कम पाठिंबा महत्त्वाचा ठरल्याचे सांगतिले.
उपजिल्हाधिकारी विलास नरवटे यांनी अभ्यास करताना इतर मोह टाळण्याचे सांगत मित्रांसोबत चहा नाश्ता जेवणावेळी केलेली गटचर्चा देखील महत्त्वाची ठरल्याचे सांगितले. वयाच्या 34 व्या वर्षी अभ्यासाला सुरुवात करून सहाय्यक निबंधकपदी निवड झालेल्या योगिता मुर्डे यांनी युनिकमधील विद्यार्थीकेंद्रीत दृष्टीकोनाचा खुप फायदा झाल्याचे सांगत शिक्षकांचे आभार मानले. संतोष खाडे, अद्वैता शिंदे, नागेश बामणे, निखील पाटील, सीमा शेख, विशाल नवले या यशवंतांनी मनोगत व्यक्त केले.
विद्यार्थ्यांच्या निवडीनंतर पालकांच्या डोळ्यातील कौतुकाचे भाव पाहणं हे अत्यंत आनंददायी असते. त्यासाठी युनिक स्थापनेपासूनच यशवंतांच्या सहकुटुंब सत्काराचे आयोजन करत असल्याचे युनिकचे संचालक तुकाराम जाधव यांनी सांगितले. एमपीएससी परीक्षेचे बदललेले स्वरुप व अभ्यासपद्धतीनुसार अनुभवी व तज्ञ शिक्षकांची टीम ही युनिकची ओळख आहे. त्यानुसार अद्ययावत संदर्भ व अभ्याससाहित्याची निर्मिती व उपक्रमांची माहिती जाधव यांनी दिली.