पुणे : ठाण्यामध्ये एका हॉटेलच्या व्यवस्थापकासह दोघांचा खुन करणाऱ्या आरोपीला स्वारगेट पोलिसांच्या मदतीने जेरबंद करण्यात आले. व्यवस्थापक स्वत:साठी चांगले जेवण मागवत होता, तर आरोपीसाठी साधे जेवण मागवत होता. या कारणावरुन चीडून आरोपीने हा खून केला असल्याची प्राथमिक माहिती आहे. कल्लू राजेश यादव ( 34, मुळ उत्तर प्रदेश) याला पर्वती येथील साजन हॉटेलमधून अटक करण्यात आली.
खून केल्यानंतर आरोपी कल्लू राजेश यादव पुण्यामध्ये मालवाहतूक आणी भाजीपाला वाहतूकीच्या वेगवेगळ्या सहा वाहनांमधून प्रवेश करून पुण्यात आला होता. येथे तो निलायम थिएटरजवळील एका हॉटेलमध्ये उतरला होता. तो वापरत असलेल्या फोनवरुन त्याचा माग काढण्यात आला होता.
कल्लू राजेश यादव याला पर्वती येथील साजन हॉटेलमधून अटक करण्यात आली. त्याने येथे आठ वर्षे काम केले होते. वर्षभरापुर्वीच तो ठाणे शीतल नगर येथील मीरा रोडवरील एमटीएनएल रोडवरील एका बारमध्ये कामाला लागला होता. ठाणे पोलिसांनी शुक्रवारी पहाटे शबरी फॅमिली रेस्टॉरंट आणि बार येथे खून झालेल्या दोघांचे मृतदेह पाण्याच्या टाकीतून बाहेर काढले होते. हे मृतदेह सडण्यास सुरवात झाली होती. मृतदेहावं वार व जखम व डोक्याला इजा झाल्याची दिसल्यावर स्थानिक पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला होता. हरेश शेट्टी (वय 48) आणि नरेश पंडित (वय 52) अशी या दोघांची नावे आहेत. एकजण रेस्टॉरंटमध्ये मॅनेजर होता, तर दुसरा वेटर म्हणून काम करत होता.