आंबेगाव बुद्रुक, दि. 3 (प्रतिनिधी) -आंबेगाव बुद्रुक परिसरातील नागरिकांच्या आरोग्यासाठी किमान 10 ठिकाणी ओपन जिम उभारण्यात येणार आहेत. हवेली-पुरंदरचे आमदार संजय जगताप यांच्या विकासनिधीतून सदर काम करण्यात येणार आहे. यानुसार नगरसेविका स्मिता कोंढरे यांच्या प्रयत्नातून मनस्वी सोसायटी व विंडसर काउंटी सोसायटीत येथे बसवलेल्या ओपन जिमचे लोकार्पण करण्यात आले.
आंबेगावात मुख्य ठिकाणी अशा पद्धतीच्या ओपन जिमचे साहित्य बसविण्यात येणार असून नागरिकांना व्यायामासाठी जिमचा वापर होणार आहे. गेली दोन वर्षापासून करोनाच्या संसर्गामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागला होता, त्यात उपलब्ध जिमच्या फी सर्वसामान्यांना परवडणाऱ्या नसल्यामुळे या ओपन जिमचा नागरिकांना फायदा होणार आहे, अशी प्रतिक्रिया माजी नगरसेविका स्मिता कोंढरे यांनी व्यक्त केली.
यावेळी जनहित विकास मंचचे अध्यक्ष सुधीर कोंढरे, सोसायटीचे चेअरमन राहुल भरगुडे, सूरज मोरे, सचिन भांडे आदी उपस्थित होते.