पिंपळे निलख – पिंपळे गुरव येथील सुदर्शननगर येथे भोसरीकडून पिंपळे सौदागरकडे जाणाऱ्या बीआरटी मार्गावर नव्याने ग्रेड सेप्रेटर तयार करण्यात आला आहे. या अंतर्गत मार्गाच्या सुरक्षेच्या दृष्टीने कोणत्याही प्रकारची सुरक्षा योजना केली नाही. त्यामुळे हा ग्रेडसेप्रेटर मृत्यूचा सापळा ठरू पाहत आहे. काही महिन्यातच अपघातांची संख्या दुपटीने वाढली आहे. त्यामुळे भविष्यात मोठ्या घटनेची प्रशासन वाट बघत आहे का? हा प्रश्न उपस्थित होत आहे.
गुरुवारी (दि. 3) रात्री येथे पुन्हा मोठा अपघात झाल्याने हा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पिंपळे सौदागर कडून भोसरी किंवा नाशिक दिशेला जाणाऱ्या या मार्गातील मुख्य रस्ता व पीएमपीएल बससाठी असलेल्या बीआरटी रस्त्याच्या व या ग्रेडसेप्रेटरच्या प्रवेश होतानाच अत्यंत धोकादायक डावीकडे जवळपास नव्वद अशांत वळण आहे. हेच वळण व याठिकाणी पुलाच्या आतील असलेल्या आधार देणारे पिलर अपघातास कारण ठरत असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे.
तर बीआरटी मार्गात नाशिक व मुंबई महामार्ग वरून येणाऱ्या व शहरातील नवख्या वाहनचालकांच्या चुकीच्या वाहन चालवताना वारंवार अपघात होत आहेत. या ठिकाणी गेल्या तीन महिन्यांत सुमारे पाच मोठे व काही लहान अपघात घडले आहेत. गुरुवारी रात्री दोन वाहनांचा समोरासमोर अपघात झाला. यात दोन्ही वाहनाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊन चालक व इतर जखमी झाले.
हा भुयारी मार्ग अतिशय वळण घेणारा व अरुंद असून याठिकाणी बीआरटी मार्गात बस चालकांशिवाय कोणीही वाहने घुसवू नयेत. अन्यथा कठोर कारवाई करण्यात येईल. त्याचप्रमाणे दोन्ही बाजूला सुरक्षा उपाय म्हणून स्पीडब्रेकर व सूचना फलक तात्काळ बसवण्याचे आदेश दिले असून वाहन चालकांनी वेगावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.
– सतीश नांदूरकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सांगवी वाहतूक विभाग.
अपघात होण्याची कारणे व ठळक मुद्दे
-बीआरटी व इतर सामान्य दोन मार्गातील उभे आयताकृती खांबांमुळे समोरून व पुढील येणारे वाहन दिसत नाही
-तीव्र वळण
-सूचना फलक, वेग नियंत्रण व इतर उपाययोजनांची कमतरता
-कायमस्वरूपी दोघ बाजूला सुरक्षा रक्षकाची गरज
-सीसीटीव्ही कॅमेरे बसवून नियम मोडणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्याची गरज
-पांढरे पट्टे व इतर रबरी स्पीडब्रेकर स्टॉपरची गरज
-स्पीडब्रेकरची गरज