औरंगाबाद – पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी आणि अटक न करण्यासाठी 5 हजार रुपयांची लाच स्वीकारताना हेड काॅन्स्टेबलला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून रंगेहाथ अटक केली आहे. सुरेश शिंदे (वय 38) असे अटक केलेल्या पोलीसाचे नाव आहे. औरंगाबाद लाचलुपचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सोमवारी (दि. 31) ही कारवाई केली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, तक्रारदार यांचे त्यांच्या मोठ्या भावाशी व भावजयीशी घरगुती वाद झाले आहेत. त्याप्रकरणी त्यांच्यावर कन्नड तालुक्यातील देगाव (रंगारी) पोलीस ठाण्यात आयपीसी 323,324,506,427 प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. या दाखल गुन्ह्यात मदत करण्यासाठी आणि अटक न करण्यासाठी पोलीस काॅन्स्टेबल सुरेश शिंदे यांनी तक्रारदार यांच्याकडे 25 हजार रुपये लाचेची मागणी केली होती.
तक्रारदार यांना लाच द्यायची नसल्याने त्यांनी याबाबत औरंगाबाद लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. त्यावरून एसीबीच्या अधिकाऱ्यांनी सापळा लावला. त्यांच्या तपासणीत हेड काॅन्स्टेबल शिंदे तडजोडीअंती 5 हजार रुपयांची लाच घेतल्याचे निष्पन्न झाले. सोमवारी सापळा लावून 5 हजारांची लाच घेताना शिंदे यांना एसीबीच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ अटक केली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप आटोळे, अपर पोलीस अधीक्षक विशाल खांबे, पोलीस उपअधीक्षक राजीव तळेकर यांच्या मार्गदर्शनाखाळी औरंगाबाद एसीबीचे पोलीस निरीक्षक सचिन साळुंखे, पोलीस निरीक्षक हनुमंत वारे, पोलीस अंमलदार दिगंबर पाठक, केवलसिंग घुसिंगे, चांगदेव बागुल यांच्या पथकाने केली आहे.