औरंगाबाद – औरंगाबादमधील बांधकाम विभागातील एका शाखा अभियंत्याकडे लाखो रुपयांचं घबाड सापडलं आहे. संजय राजाराम पाटील असे त्या लाचखोर अधिकाऱ्याचे नाव आहे. बँकेतील एकाच लॉकरमध्ये इतकं मोठं घबाड सापडल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांचेही डोळे चकाकलेत.
औरंगाबाद शहरातील एका मंदिराच्या सभागृहाच्या कामाचे बिल मंजूर करण्यासाठी संजय पाटीलने सव्वा लाखाची लाच मागितली होती. त्यात तडजोड होऊन चाळीस हजाराचा पहिला हप्ता घेताना एसीबीने पाटीलला रंगेहात पकडले. संजय पाटीलकडे पहिल्याच झडतीत कोट्यवधींचे घबाड सापडल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. एसीबीकडून अटक झाल्यानंतर त्याची घरझडती घेण्यात आली.
त्यानंतर एक लॉकर समोर आले. एसीबीच्या अधिकाऱ्यांनी लॉकर उघडलं. त्यात पाचशे आणि दोन हजाराच्या नोटांचे बंडल भरलेले होते. एवढी रक्कम पाहून अधिकाऱ्यांचे डोळे विस्फारले. त्या एकाच लॉकरमध्ये तब्बल 85 तोळे सोन्याचे दागिने आणि 26 लाख 4 हजार 500 रुपयांची रोकड सापडली आहे.
दरम्यान, लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, ही सापडलेली रक्कम आणि सोने केवळ एका लॉकरमधले आहे. आणखी किती लॉकर आहेत? किती बँकेत खाती आहेत?, घरात किती रोकड लपवून ठेवलेली आहे आणि कुठे कुठे जमीन प्लॉट आणि घराची मालमत्ता आहे याची तपासणी सध्या सुरू आहे.
लाचखोर संजय पाटीलने शेती, फ्लॅट, प्लॉट, बंगला यामध्येसुद्धा गुंतवणूक केल्याची शक्यता असल्याने त्या मालमत्तेची खुली चौकशी होणार आहे. पहिल्याच झडतीत मोठं घबाड हाती लागल्यानंतर या लाचखोर अधिकार्याकडे मोठी माया असण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.