पुणे : सातबारा उताऱ्यावर नोंद करण्यासाठी एका शेतकऱ्याकडे ५० हजारांची लाच मागणाऱ्या वडगाव मावळातील तलाठ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) पकडले.
सखाराम कुशाबा दगडे (वय ५२) असे लाचखोर तलाठ्याचे नाव आहे. दगडे यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये वडगाव मावळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका शेतकऱ्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.
शेतजमिनीची फोड केल्याची नोंद सातबारा उताऱ्यावर करण्यासाठी वडगाव मावळ येथील तलाठी कार्यालयात अर्ज केला होता. तलाठी दगडे यांनी शेतकऱ्याकडे ५० हजारांची लाच मागितली होती. शेतकऱ्याने तडजोडीत पहिल्या हप्त्यापोटी २५ हजारांची लाच देण्याचे मान्य केले. त्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली.
मुंबई-पुणे महामार्गावर विठ्ठल मंदिर परिसरात सापळा लावण्यात आला. शेतकऱ्याकडून २५ हजारांची लाच घेणाऱ्या दगडे यांना पकडले. पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अतिरिक्त अधीक्षक डाॅ. शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक नितीन जाधव आणि पथकाने ही कारवाई केली. पोलीस निरीक्षक वीरनाथ माने तपास करत आहेत.