Rajan Salvi: ठाकरे गटाचे नेते आमदार राजन साळवी (Rajan Salvi) यांच्या रत्नागिरीतील निवासस्थानी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून (एसीबी) झाडाझडती सुरू झाली आहे. एसीबीचे अधिकारी चौकशीसाठी राजन साळवी यांच्या घरी पोहोचले असून अधिकाऱ्यांकडून त्यांच्या घराची झडती घेण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वीच राजन साळवीसह त्यांच्या कुटुंबाची एसीबी कार्यालयात चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर आता त्यांच्या निवासस्थानी एसीबी पथक हजर झाले आहेत. यावर आता राजन साळवी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले राजन साळवी?
राजन साळवी म्हणाले की, “मी सर्व अधिकाऱ्यांचे स्वागत केले आहे. कारण मला हे अपेक्षित होतं. ज्या दिवशी मला एसीबीकडून पहिली नोटीस मिळाली आणि मला चौकशीसाठी उपस्थित राहण्यासाठी सांगितले त्याचदिवशी मला समजले की ही मंडळी माझ्या घरापर्यंत एक दिवस नक्की पोहोचणार. त्यामुळे मी त्यांचं स्वागत केलं. तसेच, मी त्यांना संपूर्ण सहकार्य करणार आहे.”
“मला अटक झाली तरी चालेल. हे सर्व मला काही नवीन नाही आणि मी राजन साळवी काय आहे, हे मला स्वतःला माहिती आहे. माझ्या कुटुंबाला माहिती आहे, जनतेला माहिती आहे. मी कारागृहात गेलो तरी उद्धव ठाकरे यांची साथ सोडणार नाही. याचे परिणाम काहीही होऊ देत, सामोरं जाण्याची तयारी आहे,” असेही ते म्हणाले आहेत.
दरम्यान, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून (एसीबी) ही चौकशी गुरुवारी सकाळी सुरु करण्यात आली. या चौकशीसाठी त्यांच्या निवासस्थानी आणि हॉटेलवर रत्नागिरी, रायगड येथे एसीबीचे पथक पोहचले. याशिवाय अधिकाऱ्यांनी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचीही चौकशी सुरु केली आहे.