पुणे – पीएच.डी. साठी तयार केलेला प्रबंधामध्ये सुधारण करून पुन्हा सादर करण्यासाठी महिला प्राध्यापिकेने २५ हजार रुपयांची लाच मागितल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे शहरातील शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) कारवाई केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. सांगवी पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून मार्गदर्शक (गाइड) म्हणून नेमलेल्या प्राध्यापिकेकडून हा प्रकार घडला.
डॉ. शकुंतला निवृत्ती माने (वय ५९) असे तिचे नाव आहे. ती सांगवी येथील बाबुरावजी घोलप महाविद्यालयात अर्थशास्त्र विषयाची प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. याबाबत ४० वर्षीय प्राध्यापकांनी तक्रार दिली आहे. तक्रारदारांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे अर्थशास्त्र विषयात पीएच.डी. प्राप्त करून घेण्यासाठी आनलाइन प्रबंध तयार केला आहे. तो प्रबंध विद्यापीठाकडे सादर करण्यासाठी माने हिची मार्गदर्शक म्हणून विद्यापीठाकडून नियुक्ती झाली आहे.
या प्रबंधामध्ये सुधारणा करून व त्यावर मंजुरी देण्यासाठी माने यांनी तक्रारदारांकडे २५ हजार रुपयांची लाच मागितली. त्यातील पहिला हप्ता २० हजार रुपये घेतेवेळी एसीबीने कारवाई केली. सांगवी येथील बाबुरावजी घोलप महाविद्यालयाच्या अर्थशास्त्र विभागाच्या कार्यालयात शनिवारी (दि. ३०) ही कारवाई करण्यात आली.
पुणे क्षेत्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शीतल जानवे, यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पुणे येथील पोलीस उपअधीक्षक सुदाम पाचोरकर तपास करत आहेत.