– हिमांशू
मोबाइलच्या छोट्या पडद्यावरील रीलपासून मल्टिप्लेक्सच्या मोठ्या पडद्यापर्यंत आणि नाट्यगृहापासून राजकीय आखाड्यापर्यंत सर्वत्र विनोदाला सध्या चांगले दिवस आहेत. कायिक, वाचिक आणि मुद्राभिनयाद्वारे विनोदाची पेरणी करून पब्लिकला वश करण्याची धडपड केवळ अभिनेतेच नव्हे तर नेतेही करत असतात. ‘निखळ विनोद हरवलाय,’ अशी टिप्पणी वारंवार करणारेही समोर जे दिसेल ते पाहून कधी मनापासून तर कधी निमूटपणे हसताना दिसतात. दुःख आणि चिंतांनी हिरमुसून बसणं आपल्याला ङ्गार काळ आवडत नाही; जमतही नाही आणि म्हणूनच हसणं-हसवणं वर्षानुवर्षे सुरू आहे. हसवणं ही कष्टसाध्य कला मानली जाते. ‘लोकांना रडवणं सोपं आहे;
पण हसवणं अवघड आहे,’ या डायलॉगपासून सुरुवात करून ‘लोकांना विचार करायला लावणं हा गुन्हा आहे,’ या मानसिकतेपर्यंत आपण उत्क्रांत झालो आहोत. ‘टवाळा आवडे विनोद’ वगैरे तर कधीच विसरलो आहोत. एखादी कलाकृती ‘उगाचच वैचारिक होऊ दिलेली नाही,’ अशी प्रशस्तिपत्रं वाटून समीक्षक मंडळींनी या ‘उत्क्रांती’वर शिक्कामोर्तबही केलेलं आहे. परंतु विनोदबुद्धी सगळ्यांकडे असते असं नाही.
ही कला आत्मसात करण्यासाठी जो-तो धडपडतो. ‘पंच’ पडला तरी चालेल; पण प्रयत्न करणारच, या निर्धाराने अनेकजण सातत्यानं विनोदनिर्मितीचा ध्यास घेऊन नको तिथं नको ते बोलताना-करताना दिसतात. पण कधी-कधी सगळंच बिनसतं आणि करुण विनोद जन्माला येतो. ‘नको तिथं’ केलेला असाच एक विनोद भारतीय वंशाच्या तरुणाला स्पेनमध्ये दोन वर्षांनी टोचू लागलाय.
एका बेटावर जाण्यासाठी तो विमानात बसला होता आणि स्नॅपचॅटवरून त्याने मित्रांना मेसेज पाठवला, की आपण तालिबानी आहोत आणि विमान उडवून देणार आहोत. आपलं ‘चॅट’ सुरक्षित आहे, अशी अंधश्रद्धा बाळगणार्या या तरुणाने प्रवास सुरू केला आणि ब्रिटनच्या अधिकार्यांनी संबंधित मेसेजबद्दल स्पेनच्या अधिकार्यांना कळवलं. विमानात आपली ‘विशेष देखभाल’ केली जातेय, हे त्याच्या लक्षातच आलं नाही आणि विमान लँड होताच त्याला अटक झाली. दोन दिवस कोठडीत घालवल्यानंतर त्याला जामीन मिळाला; पण त्याच्यावरचा खटला आता सुरू झालाय.
प्रवास सुरू असतानाच दोन लढाऊ विमानं संंबंधित विमानाच्या जवळून उडत होती आणि ते पाहून घाबरलेल्या प्रवाशांना वैमानिकाने काही सूचनाही केल्या होत्या. एवढं सगळं झाल्यानंतर विनोदवीरावर कारवाई होणं अटळ होतं. प्रवासात शेजारून उडणारी लढाऊ विमानं बदलत्या आंतरराष्ट्रीय परिस्थितीमुळे आपल्या ‘सेवेत’ असावीत, असं खुद्द विनोदवीरालाही वाटलं होतं. रशिया आणि युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर हा सगळा सरंजाम आहे, असं त्याला मनापासून वाटलं होतं.
आपण लहानपणापासूनच विनोदी वृत्तीचे आहोत आणि शालेय जीवनापासूनच मित्रांसोबत हास्यविनोदाचा छंद आपल्याला आहे, असं या तरुणाने कोर्टात सांगितलंय. तालिबान वगैरेचा उल्लेख असलेला मेसेज आपण चेष्टेने पाठवला आणि केवळ आपल्या मित्रांच्या वैयक्तिक ग्रुपमध्येच पाठवला, असा बचाव त्यानं केलाय; पण आरोप सिद्ध झाला तर साडेबावीस हजार यूरो म्हणजे जवळजवळ वीस लाख रुपयांचा दंड त्याला होऊ शकतो. शिवाय लष्करी विमानांचा खर्च म्हणून स्पेनने 85 लाख रुपये मागितलेत, ते वेगळेच. याला म्हणतात करुण विनोद!