– हिमांशू
मध्यंतरी लोकांनी ‘चड्डी-बनियन गँग’ या शब्दाचा मोठा धसका घेतला होता. उत्तररात्री सर्वजण गाढ झोपेत असताना ही गँग अर्धी चड्डी आणि बनियन अशा वेशात उच्चभ्रूंच्या घरात चोरी करून मिळेल त्या ऐवजावर डल्ला मारत असे. चोरी करताना कुणाला जाग आली किंवा कुणी अडथळा आणला, तर ही गँग संबंधिताला मारहाण करून जखमी करत असे. अशा घटनांमध्ये काहीजणांचा मृत्यूही झाला होता. या घटनांवर घडलेली-न घडलेली हकीकत सांगून गप्पा रंगवल्या जात असत. घरात पाळीव कुत्रा असेल, तर त्यालाही गायब करण्याची किमया या टोळीकडे आहे, असं बोललं जायचं. कुणी म्हणायचं, पोलिसांच्या प्रशिक्षित श्वानांना माग काढता येणार नाही, अशी व्यवस्था ही टोळी करते.
दरोडा टाकताना कुणी आडवा आलाच, तर त्याला मरेपर्यंत मारायचं ही या टोळीची खासीयत असल्याचंही सांगितलं जायचं. पण सर्वाधिक चर्चा रंगायची या टोळीच्या ‘गणवेशा’ची! त्यांची चड्डी आणि बनियनसुद्धा काळ्या रंगाचा असतो, असं त्यांना न बघितलेले लोक आत्मविश्वासानं सांगायचे. अंधारात कुणी पाहू नये, हा यामागचा उद्देश असल्याची पुस्तीही जोडायचे. काहीजण म्हणायचे, अर्धी चड्डी असल्यामुळे वेगाने पळता येतं म्हणून ते असा वेश करतात. काहीजण सांगायचे, दरोडेखोर ङ्गक्त चड्डीच वापरतात आणि उघड्या अंगाला तेल लावतात. म्हणून ते कुणाच्या हाती लागले तरी लगेच सटकतात आणि पळ काढतात.
गँग कोणतीही असो, वैशिष्ट्यांवर चर्चा होणारच. ङ्गटका गँग, कोयता गँग, चड्डी गँग या यादीत आता आणखी एक नाव समाविष्ट झालंय- चुडीदार गँग. घटना हैदराबादमधील आहे. सीसीटीव्हीचा जागता पहारा असलेल्या आरएसनगर भागातल्या एका सोसायटीत शनिवारी घरङ्गोडी झाली. परगावी गेलेल्या कुटुंबाच्या घरातून सोनंनाणं आणि रोकड चोरीला गेली. सकाळी कामावर आलेल्या मोलकरणीला कुलूप तुटलेलं दिसलं आणि संबंधित कुटुंबाने पोलिसात धाव घेतली. सीसीटीव्ही ङ्गुटेजमध्ये दोन बायका पहाटेच्या वेळी पार्किंगमध्ये आल्याचं दिसतं. नंतर त्या दोघी जिन्यावरून पहिल्या मजल्यावर जातात. तिथे थोडा वेळ रेंगाळल्यावर वरच्या मजल्यावर जाताना दिसतात.
चोरीच्या घटनेनंतर त्या बिनधास्तपणे बिल्डिंगबाहेर पडताना दिसतात. त्यांनी तोंडावर स्कार्ङ्ग किंवा मास्क बांधलेले आहेत. उत्तररात्री दोन बायका इतक्या बिनधास्तपणे कशा वावरतात? पोलिसांना संशय आला. सीसीटीव्ही ङ्गुटेज पुनःपुन्हा पाहिलं गेलं, तेव्हा लक्षात आलं, की या बायकांची बॉडी लँग्वेज पुरुषी आहे. शरीराची ठेवण, उंची या बाबीही ते पुरुषच असावेत असं दर्शवणार्या आहेत. त्यामुळे आता ‘स्त्रीवेशातील पुरुष’ हा धागा पकडून हैदराबाद पोलिसांनी तपासासाठी पथकं रवाना केलीत.
या मंडळींनी स्त्रीवेशात यापूर्वीही अनेक गुन्हे केले असतील. पण ‘चुडीदार गँग’हे नाव वेगाने पसरलं, ते सीसीटीव्ही ङ्गुटेजमुळे. गुन्हे घडू नयेत, घडलेच तरी लगेच उघडकीस यावेत म्हणून सीसीटीव्हीचं जाळं सगळीकडे पसरलं. पण ‘इथे सीसीटीव्ही आहेत, इथे चोरी करता कामा नये,’ असा या यंत्रणेचा वचक निर्माण झाला नाही. या यंत्रणेमुळे आपण निर्धास्त झालो, अशी भावनाही निर्माण झाली नाही. बेकायदा कृत्य करताना अधिक डोकं चालवावं लागतं, हे या मंडळींनी पुन्हा दाखवून दिलंय.