– प्रा. विजय कोष्टी
भारतीय प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन यांचा दोन दिवसीय दौरा पार पडला. त्यांच्या भेटीचे फलित पाहता भारत-फ्रान्स मैत्रीचे नवे पर्व सुरू झाल्याचे दिसते.
नुकतेच फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी दोन दिवसांचा भारत दौरा केला. या दौर्याची सुरुवात त्यांनी गुलाबी शहर जयपूरमधून केली. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत जयपूर शहरामध्ये रोड शो केला. रोड शोमध्ये मोठ्या संख्येने लोक जमले होते. यावेळी पंतप्रधान मोदींनी अयोध्येत नव्याने बांधलेल्या राम मंदिराची प्रतिकृती मॅक्रॉन यांना भेट दिली. दोन्ही नेत्यांनी एकत्र चहाचा आस्वादही घेतला.
रोड शोनंतर, दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय धोरणात्मक भागीदारी आणखी मजबूत करण्यासाठी विस्तृत चर्चा केली. ‘ताज रामबाग पॅलेस’ येथे उभय नेत्यांमध्ये झालेल्या चर्चेत संरक्षण आणि सुरक्षा, धोरणात्मक मुद्दे, व्यापार, हवामान बदल आणि आण्विक ऊर्जा यासह इतर क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्यावर भर देण्यात आला. दोन्ही देशांनी महत्त्वपूर्ण लष्करी हार्डवेअर विकसित करण्यासाठी महत्त्वाकांक्षी संरक्षण औद्योगिक रोड मॅपवर स्वाक्षरी केली आणि एअरबस एसई आणि टाटा अॅडव्हांस्ड सिस्टम्स लिमिटेड एच-125 हेलिकॉप्टर संयुक्तपणे तयार करण्याचे मान्य केले.
मोदी-मॅक्रॉन चर्चेच्या निकालाची घोषणा करताना परराष्ट्र सचिव विनय क्वात्रा म्हणाले की, 18 ते 35 वर्षे वयोगटातील व्यावसायिकांना एकमेकांच्या देशांमध्ये पाठवण्याची योजना आहे आणि पदव्युत्तर पदवी पूर्ण केलेल्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी पाच वर्षांच्या वैधतेसह शेंजेन व्हिसा मंजूर करणे हा महत्त्वाच्या निर्णयांपैकी एक आहे. नागरी-अणुऊर्जा सहकार्य पुढे नेण्यासाठी दोन्ही बाजूंनी विविध पैलूंवर चर्चा केल्याचे क्वात्रा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन हे प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे होते. त्यांचा हा तिसरा भारत दौरा आहे. विशेष म्हणजे फ्रान्स हा असा देश आहे ज्याच्या राष्ट्रीय अध्यक्षांना भारताने प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून सर्वाधिक वेळा आमंत्रित केले आहे. गेल्या वर्षी जुलैमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फ्रान्सला भेट दिली होती.
राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांचा भारत दौरा अनेक कारणांनी महत्त्वाचा आहे. भारत आणि फ्रान्स हे सामरिक मित्र आहेत. या भेटीमुळे दोन्ही देशांमधील राजनैतिक आणि आर्थिक संबंध अधिक दृढ होतील. राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन आणि पंतप्रधान मोदी यांच्या परस्पर निकटतेमुळे भारत आणि फ्रान्समधील द्विपक्षीय संबंधांना मोठा आधार मिळाला आहे. वर्ष 2022-23 मध्ये, दोन्ही देशांमधील व्यापार 19.2 अब्ज डॉलरच्या उल्लेखनीय पातळीवर पोहोचला. एप्रिल 2000 ते मार्च 2023 या कालावधीत फ्रान्समधून 10.5 अब्ज डॉलरची थेट विदेशी गुंतवणूक भारतात आली आहे. फ्रान्स भारतातील 11व्या क्रमांकाचा सर्वात मोठा गुंतवणूकदार आहे.
अलीकडच्या काळात, लढाऊ विमानांची खरेदी, पाणबुडी बांधणे, अंतराळ संशोधन इत्यादी क्षेत्रात वाढत्या सहकार्यामुळे धोरणात्मक सहकार्याला मोठी गती मिळाली आहे. भारताच्या महत्त्वाकांक्षी स्मार्ट सिटी मिशनमध्ये फ्रान्स देखील एक महत्त्वाचा सहयोगी आहे. मिशनला फ्रान्सच्या शहरी नियोजन आणि वास्तुशास्त्रातील कौशल्याचा फायदा होत आहे.
हवामान बदलाच्या आव्हानांचा सामना करण्यासाठी आणि स्वच्छ ऊर्जा वाढवण्यासाठी, अध्यक्ष मॅक्रॉन आणि पंतप्रधान मोदी यांच्या संयुक्त नेतृत्वाखाली आंतरराष्ट्रीय सौर आघाडी स्थापन करण्यात आली आहे, ज्यामध्ये 100 हून अधिक देश सहभागी आहेत. फ्रान्स हा युरोपियन युनियनचा प्रभावशाली सदस्य आहे. भारत आणि युरोपियन युनियन यांच्यात ठोस व्यापार करारावर दीर्घकाळापासून चर्चा सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच भारताने युरोपीय देशांच्या गटाशी मुक्त व्यापार करार केला आहे. या भेटीदरम्यान व्यापार करारांबाबत उत्साहवर्धक प्रगती होईल, अशी आशा आहे.
1998 मधील भारताची अणुचाचणी असो, जम्मू-काश्मीरचा मुद्दा असो, सुरक्षा परिषदेत भारताचा कायम सदस्यत्वाचा दावा असो, पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद असो किंवा चीनविरुद्ध भारताची क्षमता वाढवण्यात सहकार्य असो, फ्रान्सने आंतरराष्ट्रीय मंचांवर नेहमीच मोठी भूमिका बजावली असून प्रत्येक मुद्द्यांवर भारताला पाठिंबा दिला आहे.
उगवती शक्ती म्हणून भारताची क्षमता फ्रान्सला फार पूर्वीपासून समजली होती. भारताचाही फ्रान्सबाबत सकारात्मक दृष्टिकोन होता. या परस्पर विश्वासाचे चांगले परिणाम आता दिसू लागले आहेत. द्विपक्षीय सहकार्य वाढवण्यासोबतच अध्यक्ष मॅक्रॉन आणि पंतप्रधान मोदी हे पश्चिम आणि ग्लोबल साउथ यांच्यातील सहकार्याचा मुख्य दुवा बनू शकतात, हे या दौर्याचे फलित म्हणता येईल.