पुणे – बिग बाॅस फेम अभिजीत बिचुकले यांच्या गाडीचा अपघात झाला आहे. सुदैवाने कोणतीही जीवीत हानी झाली नाही. अपघातात अभिजीत यांच्यासह त्यांचे चार मित्र जखमी झाले आहेत. अभिजीत यांच्या डोक्याला दुखापत झाली असून त्यांच्यावर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आले असून विश्रांती घेण्याचा डाॅक्टरांनी सल्ला दिला आहे. बिचुकले हे मित्रांसह पुण्यात आले असता त्यांच्या कारला अपघात झाला. सध्या त्यांची प्रकृती ठीक आहे. बिचुकले हे मुळचे साताऱ्याचे आहेत. पुण्यातही त्यांचे घर आहे. सध्या ते पुण्यातील घरी आराम करत आहेत.
राष्ट्रपती पदासाठी अर्ज करणे, वेगवेगळी लक्षवेधी विधाने करणे, राजकीय नेते आणि बाॅलिवूड अभिनेत्यांशी पंगा घेणे यावरून ते सतत चर्चेत असतात. तर बिग बाॅसमधील त्यांच्या एन्ट्रीमुळे त्यांची ओळख संपूर्ण राज्यभर झाली आहे. अपघाताची माहिती मिळताच त्यांचे चाहते, नातेवाईक फोन करून त्यांची विचारपूस करत आहेत.
अपघातानंतर अभिजीत बिचुकले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, माझा किरकोळ अपघात झाला आहे. सुदैवाने या अपघातात मला गंभीर दुखापत झाली नाही. माझ्या अपघाताबाबतीत काही अफवा पसरवण्यात आल्या होत्या मात्र तसं काहीही नाही आहे. मी एकदम बरा आहे. खासगी डॉक्टरांच्या सल्ल्याने माझ्यावर उपचार सुरु आहे. येत्या काही दिवसातच मी ठणठणीत बरा होऊन पुन्हा समाजकार्यासाठी सक्रिय होणार आहे. सध्या त्यांचे पुण्यात कंदी पेढ्याचे दुकान आहे. काही महिन्यांपूर्वी त्यांनी हे दुकान सुरु केले आहे. याच व्यावसायानिमित्त ते प्रवास करत असतात.