जोहान्सबर्ग – दक्षिण आफ्रिकेचा स्टार फलंदाज ए. बी. डीव्हिलियर्स निवृत्तीचा निर्णय मागे घेत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुन्हा परतणार असल्याचे संकेत मिळत आहेत. आधी इंडियन प्रीमिअर लीगमधील (आयपीएल) कामगिरी पाहू मगच माध्यमांशी बोलेन असे खुद्द डीव्हिलियर्सने सांगितल्यामुळे त्याच्या पुनरागमनाचे वृत्त खरे असल्याचेही स्पष्ट होत आहे.
जागतिक क्रिकेटमध्ये एन भरात असतानाही डीव्हिलियर्सने 2018 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करत क्रिकेट वर्तुळाला धक्का दिला होता. त्यावेळी डीव्हिलियर्स अनेक देशांतील टी-20 क्रिकेट लीग खेळत होता, तसेच दक्षिण आफ्रिका संघातूनही तो विविध मालिकांमध्ये सहभागी होत होता. सातत्याने खेळून थकलो असून आता कुटुंबाला वेळ देता यावा यासाठी आपण निवृत्ती घेतल्याचे त्यावेळी डीव्हिलियर्सने सांगितले होते. निवृत्तीनंतरही तो परदेशी लीगमध्ये खेळत होता.
त्याचवेळी आयपीएलमध्ये बेंगळुर संघाकडूनही तो सहभागी होत होता. या काळात दक्षिण आफ्रिका संघाची कामगिरी खूपच खालावली होती. संघाला अनेक मालिकांमध्ये पराभवांचा सामना करावा लागला. त्याचवेळी अनेक आजी माजी खेळाडूंनी डीव्हिलियर्सने आपली निवृत्ती मागे घेत देशासाठी संघात परतावे अशी विनंती केली होती.
डीव्हिलियर्सबरोबर जे. पी. डुमिनी, हाशिम आमला व इम्रान ताहिर यांनीही निवृत्ती घेतल्याने संघात अनुभवी खेळाडूच नव्हते. माझ्या पुनरागमनाबाबत सध्या काही बोलणे योग्य होणार नाही. सध्यातरी मी केवळ आयपीएलवर लक्ष ठेवून आहे. ही स्पर्धा झाली व त्यात माझी कामगिरी सरस झाली तरच मी निवृत्ती मागे घेण्याबाबत विचार करीन असे डीव्हिलियर्सने स्पष्ट केले आहे.