भिलार : पाचगणी ( ता. महाबळेश्वर) या पर्यटनस्थळी व परिसरात परदेशातून तसेच ज्या ठिकाणी करोनाचा प्रादुर्भाव असणाऱ्या ठिकाणाहून आलेल्या १०० जणांना विलगीकरण कक्षात (होम क्वारंटईन कक्ष) ठेवण्यात आल्याची माहिती आरोग्य विभाग व पालिका प्रशासनाकडून आज देण्यात आली.
हे लोक नेपाळ, अमेरिका, आबुधाबी, पिंपरी चिंचवड , मुंबई येथून आल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. यामध्ये आज पालिका प्रशासनाने होम टू होम सर्वेक्षण केले. यामध्ये सर्व प्रभागात मिळून परदेशातून १० तसेच पुणे, मुंबई इथून ७६ लोक पाचगणीत दाखल झाल्याची माहिती मिळत आहे तसेच आरोग्य विभागाच्या ग्रामीण परिसरातील सर्वेक्षणात १४ जण बाहेरून आल्याचे निदर्शनास आले आहे, असे मिळून एकूण १०० लोकांनां घराच्या स्तरातील विलगीकरण कक्षात राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
त्यांनी समूहात, समाजात फिरणे घातक असू शकते त्यामुळे कुटुंबीयांनीही त्याच्या संपर्कात येऊ नये, असे सुचवले आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई, पुणे व इतरत्र ठिकाणाहून बरेचसे लोक गावाकडे रवाना झाले आहेत. आरोग्य विभागाने याचे सर्वेक्षण केले असता पाचगणी आरोग्य केंद्राच्या अखत्यारीतील २६ गावांमध्ये बाहेरून ६८३ लोक आल्याची नोंद आरोग्य विभागाकडे झाली असून या सर्वांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे.
पाचगणीत येणाऱ्या प्रत्येकावर आरोग्य विभाग, नगरपालिका व पोलिसांकडून वॉच ठेवला जात असून विलगीकरण कक्षात ठेवलेल्या १०० जणांवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे. या पुणे मुंबई तसेच परदेशी पाहुण्यांमध्ये कोणतीही करोनाची लक्षणे नसून खबरदारीसाठी त्यांना निगराणीखाली ठेवण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
एक जण पळाला…
परदेशातून आलेला व एक दिवस पाचगणीत राहिलेला पण घर विलगीकरण कक्षातील एक रुग्ण पाचगणीत दाखल झाल्याची माहिती मिळताच आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली . त्या रुग्णाला कर्मचाऱ्यांनी गाठला. त्याच्या हातावर ‘ होम क्वारंटईन ‘ असा शिक्का होता. आज त्याच्या तपासणीसाठी आरोग्य कर्मचारी गेले असता तो परस्पर आपला ड्रायव्हर व दुसऱ्या एकाबरोबर पुन्हा मुंबईला गेल्याची माहिती मिळाल्याने आरोग्य यंत्रणाही चक्रावून गेली आहे.