पुणे – पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) यांच्या तर्फे पीएमडीटीए मानांकन अनिकेत वाकणकर टेनिस अकादमी एनसीएल ब्रॉन्झ सिरिज स्पर्धेत आयुष देऊसकर, अव्यन पुलगम,रितीशा नेहे, इश्ना नायडू यांनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून विजेतेपद संपादन केले.
अनिकेत वाकणकर टेनिस अकादमी एनसीएल पाषाण रोड या ठिकाणी पार पडलेल्या या स्पर्धेत १० वर्षाखालील मुलांच्या गटात अंतिम फेरीत चौथ्या मानांकित आयुष देऊसकरने यश मानेचा ७-५ असा पराभव करून विजेतेपद पटकावले.
मुलींच्या गटात अंतिम फेरीत अव्वल मानांकित इश्ना नायडू हिने आठव्या मानांकित पलक पाटीलचा ७-१ असा सहज पराभव करून विजेतेपदाचा मान पटकावला. ८ वर्षाखालील मुलांच्या गटात बिगरमानांकित अव्यन पुलगमने अव्वल मानांकित पलश रूचंदानीचा टायब्रेकमध्ये ७-६ असा पराभव विजेतेपदाला गवसणी घातली.
मुलींच्या गटात अंतिम लढतीत तिसऱ्या मानांकित रितीशा नेहेने अव्वल मानांकित अदिरा भगतचा ७-६ असा पराभव करून विजेतेपद पटकावले. स्पर्धेचे पारितोषिक वितरण स्पर्धा संचालक अनिकेत वाकणकर, निलेश गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सुपरवायझर सरदार ठाकूर उपस्थित होते.